आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकातील खड्डय़ांबाबत राज ठाकरेंनी पाळले मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यकाळात झालेल्या रस्त्यांना खड्डे पडले नसल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशकातील मेळाव्यात रविवारी राज ठाकरे यांना टोला हाणला. योगायोगाने राजही नाशकात असल्याने नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत विचारले असता, त्यांनी मात्र मौन पाळले.

संपूर्ण शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाबाबत मात्र आजी-माजी सत्ताधार्‍यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. राज यांनी हे रस्ते माझ्या कार्यकाळात झाले नसून, यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी हे रस्ते केले आहेत. पडलेल्या खड्डय़ांना तेच जबाबदार आहेत. त्यांनाच जाब विचारा, असे सांगत शिवसेनेवर शरसंधान साधले होते. त्यानंतर रविवारी शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही या मुद्याला हात घातला. आमच्या सत्ताकाळात झालेले रस्ते अजूनही तसेच आहेत. त्यांना खड्डे तर सोडा खड्डाही पडलेला नाही. नव्या सत्ताधार्‍यांच्या कार्यकाळात जे रस्ते झाले त्यांनाच खड्डे पडल्याचा खुलासा करत सरळ राज यांना उत्तर देत त्यांचा समाचार घेतला. त्यावर दुपारच्या सत्रात महापौर अँड. यतिन वाघ यांच्या भेटीसाठी नाशकात राज आले. या भेटीनंतर परतताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता, मी याबाबत काहीही बोलणार नसल्याचे सांगत खड्डय़ांवर बोलणे टाळत सरळ आपल्या वाहनात बसणे पसंत केले.

महापौरांची भेट पाच मिनिटांची
महापौर अँड. यतिन वाघ यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी रविवारी आलेल्या राज यांनी त्यासाठी पाचच मिनिटे वेळ दिला. त्यांचा हा खासगी दौरा होता. ते आपल्या मित्राच्या पाल्याचा मानस रिसॉर्ट येथे साखरपुड्याचा आणि हॉटेल एक्स्प्रेस इन येथे रिसेप्शन कार्यक्रमासाठी आले होते. दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत कार्यकर्ते मात्र ताटकळले होते.