आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बुधवारच्या दौर्यातून काहीतरी भरघोस पदरी पडण्याची आशा फोलच ठरली. नियोजित दौर्यात काटछाट करत राज यांनी निवडक ठिकाणांनाच धावती भेट दिली. नाशिककरांना दुर्गंधीचा त्रास सोसाव्या लागणार्या खत प्रकल्प परिसरात जाऊनही जवळ जाणे टाळत त्यानंतर त्यांनी दौरा झटपट पूर्णत्वास नेला. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी ठाकरे यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. गुरुवारीही अनेक कामांना त्यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
दोन दिवसांच्या दौर्यावर आलेल्या राज यांनी पहिल्या दिवशी गंगापूर धरणावर गंगापूजनाला आपल्या ताफ्यासह हजेरी लावली. त्यांच्याच हस्ते पूजन होण्याची चर्चा असताना त्यांनी तेथे जाताच महापौर अँड. यतिन वाघ व पक्षाचे सरचिटणीस आमदार वसंत गिते यांच्या हातून पूजा घडवून आणली. यानंतर आमदार अँड. उत्तमराव ढिकले, आमदार नितीन भोसले, सुजाता डेरे यांच्या हस्ते धरणात र्शीफळ अर्पण करण्यात आले. स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई, अशोक मुर्तडक, सचिन ठाकरे, समीर शेटे, गुलजार कोकणी, यशवंत निकुळे, हरिभाऊ लोणारी, सुवर्णा मटाले, राजेंद्र डोखळे, शीतल भामरे आदी या वेळी उपस्थित होते. धरणावरून राज यांचा ताफा फाळके स्मारकाकडे वळला.
मित्र-विरोधकही अनुपस्थित : गंगापूजनासाठी महापौरांनी आमंत्रण देऊनही भाजपच्या एकाही पदाधिकारी व नगरसेवकाने हजेरी लावली नाही. सत्तेत सहभाग असूनही भाजपने दौर्याकडे पाठ फिरवल्याने सत्तेतील दोन्ही मित्रांमध्ये काही बिघडले की काय, अशी चर्चा होती. भाजपसह विरोधकांनीही पूजनाला न येणेच पसंत केले.
‘साहेबा’चा ठेचा. अन् तेव्हाचे महापौर
राज यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी व काही पदाधिकार्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी त्यांनी शिवसेनेत असताना ‘साहेबा’तील जेवणाचा एक किस्सा ऐकवला. एका महापौराबरोबर जेवणासाठी आलो असता त्या महाशयांनी प्लेट भरून ठेच्यावर ताव मारल्याची आठवण त्यांनी सांगितली. ‘महापौर असतानाच त्यांनी हे सर्व खाल्ले का’ असे विचारता ‘महापौर असतानाच त्यांनी खूप खाल्ले (ठेचा)’ असे राज म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
थेट गाठले विश्रामगृह
खत प्रकल्पापासून साहेब निघालेल्या दिशेने सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वाहनेही निघाली, ती थेट छत्रपती संभाजी स्टेडियमच्या प्रांगणात जाऊनच थांबली. तेथे राज यांनी शहर अभियंता सुनील खुने यांच्याकडून नकाशाच्या आधारे माहिती घेत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर ते मैदानाची पाहणी करण्यासाठी वळले असता झालेल्या गर्दीमुळे त्यांनी लगेचच काढता पाय घेतला. ते पेलिकन पार्ककडे जाणार असल्याचे समजल्याने तेथे आधीच नगरसेवक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र, तिकडेही न जाता फ्रेश होण्यासाठी त्यांनी थेट शासकीय विश्रामगृह गाठले.
फाळके स्मारकात केवळ दोन मिनिटे
फाळके स्मारकात केवळ दोन मिनिटे हजेरी लावत व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्याकडून माहिती घेऊन राज यांनी नकाशाची पाहणी केली. यासंदर्भात अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी दिले. ताफा खतप्रकल्पाकडे निघाला. जवाहरलाल नेहरू उद्यानाची पाहणी करण्यासाठी ते थांबले; मात्र उद्यानाला कुलूप असल्याचे लक्षात येताच ते पुढे निघाले. खत प्रकल्पाच्या अगदी जवळ पोचलेल्या राज यांनी अचानक गाडी थांबवत पदाधिकार्यांना दौर्याविषयी माहिती विचारली. जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी जवळच खतप्रकल्प असल्याचे सांगितले. मात्र, कचर्याचे ढीग दुरूनच पाहत राज यांनी तिकडे जाणे टाळले. हातानेच नकार देत गाड्या फिरवा, असे आदेश त्यांनी दिल्याने ताफा विल्होळी एस्कॉर्ट नाक्यापासून वळवण्यात आला.
... शेवटी खड्डय़ांमधूनच ‘वाट’चाल
गंगापूर धरणाच्या नियोजित दौर्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने गंगापूर गावापर्यंतच्या रस्त्याची रात्रीतून डागडुजी केली. मात्र, परतीच्या मार्गाने सातपूर, त्र्यंबकरोड, सातपूर- अंबड लिंकरोड असा प्रवास करताना राज ठाकरे यांना खड्डय़ांतूनच वाटचाल करावी लागली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.