आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे घेणार आता नाशिकचा ग्राउंड रिपोर्ट; २८ नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये तळ ठोकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पक्षाची लाट हवेत विरण्यामागची नेमकी कारणे कोणती, पक्षाविषयी लोकांच्या काय अपेक्षा आहेत तसेच नाराजी जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे हे २८ नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. या वेळी १२२ प्रभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन पक्षाच्या स्थितीचा ग्राउंड रिपोर्टही ते घेणार आहेत.

लोकसभा विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाल्यानंतर राज यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. सध्या ते पुण्यात असून, २८ नोव्हेंबरला नाशिकमध्ये ते येणार आहेत. लोकसभा निवडणुकीपासून नाशिकच्या बालेकिल्ल्यातील मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. प्रामुख्याने शहरातील नवनिर्माणापेक्षा मूलभूत कामांकडे पदाधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले होते.
या पार्श्वभूमीवर राज यांनी संघटनात्मक बांधणीवर उपाय शोधण्यासाठी पाठवलेले संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्याशी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सूर जुळले नाहीत. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते वसंत गिते यांचे नाराजीनाट्य उफळून आले. त्यावर तोडगा निघून पक्ष स्थिरसावर होत नाही तोच विधानसभा निवडणूक आली. या निवडणुकीत नाशिकच्या गडाला जबरदस्त हादरा बसल्यावर मनसेत पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. त्यातून पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले गिते यांच्यासह दोन जिल्हाध्यक्ष तसेच २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना अन्य पक्षात घेण्यासाठी आमंत्रणेही आली, तर दुसरीकडे संबंधित पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध केल्यामुळे या सर्वांचा कथित पक्षप्रवेशही लांबला. या नाराज पदाधिकाऱ्यांनी मात्र आपण मनसेतच असल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी दिले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबरला राज हे नाशिकमध्ये येत आहेत. २९ ३० नोव्हेंबर या दोन दिवसात ते पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काय मलमपट्टी करता येईल हे पाहणार आहेत. मुळात पक्षाला पुन्हा तळापर्यंत नेण्यासाठी लोकांच्या मनातील खदखद अडचणी जाणून घेण्यासाठी ते प्रभागप्रमुखांच्या बैठकी घेणार आहेत. यात मिळालेला ग्राउंड रिपोर्ट लक्षात घेत ते नगरसेवकांमार्फत पुन्हा लोकांपर्यंत पोहचतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाराजांचा राज यांना ‘दे धक्का’
एकीकडे राज हे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना धक्का देण्याची खेळी नाराज गटाकडून होण्याची शक्यता आहे. पक्षातून राजीनामे दिलेले काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असून, त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी ‘बाबा’ कनेक्शन वापरले जात असल्याचेही बोलले जाते.
मुळात यातील काही पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उघड विरोध केला होता. त्यानंतरही पक्षप्रवेश झाल्यास भाजपात मोठी गटबाजी उफळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.