आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींकडून ‘राज’स्तुती ! भाजप-मनसे नेत्यांच्या भाषणबाजीतून नव्या समीकरणाचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती बळकट करण्याच्या आणाभाका घेणाया भाजप नेत्यांनीच ‘मित्रधर्म’ बाजूला ठेवत पुन्हा मनसेशी जवळीक साधल्याचे चित्र शनिवारी नाशिकमध्ये पाहायला मिळाले. भाजपचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरेंचे गुणगाण गायल्याने महायुतीत पुन्हा मनसे प्रवेशाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू झाली.नाशिकमधील गोदापार्क प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी झाले. या कार्यक्रमाला राज यांनी आपले खास ‘मित्र’ गडकरींना निमंत्रण दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच राज यांनी मोदींवर टीका केल्याने गडकरी उपस्थित राहतील काय? याबाबत शंका होती.
मात्र ‘मित्रधर्मा’ला जागत गडकरींनी राज यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली.‘मुंबईत मोठ-मोठे प्रकल्प उभे राहावेत, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची इच्छा होती. त्याला गडकरींची जोड मिळाल्याने मुंबईत उड्डाणपूल, एक्स्प्रेस हायवे कसे साकार होऊ शकले. तेव्हा गडकरी नसते तर हे काम शक्य नव्हते,’ अशा शब्दात राज यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. गोदापार्क ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. हा प्रकल्प राजकारणाच्या पलीकडचा असून तो नाशिककरांसाठीच असल्याचे राज यांनी ठणकावून सांगितले.
तुलना लंडनशी
गडकरी यांनी गोदापार्क परिसराची तुलना लंडनमधील शेक्सपियरच्या गावाबरोबर केली. चांगल्या कामासाठी राज यांचा नेहमीच होकार असतो, असे सांगत शिवसेनाप्रमुखांबरोबर राज यांचा नेहमीच कशाप्रकारे हिरीरीने सहभाग असायचा, हेही पटवून सांगण्याचा गडकरींनी प्रयत्न केला. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुखांची आठवण काढताना गडकरींनी उद्धव ठाकरेंचा मात्र नामोल्लेखही केला नाही.
नागपूरचे आमंत्रण
महाराष्‍ट्रात पर्यटनाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊन बेरोजगारी दूर करता येऊ शकते. नागपूर येथे पर्यटनस्थळ उभारून सुमारे पाच हजार आदिवासींना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे गडकरींनी सांगितले. याच कार्यक्रमात गडकरी यांनी राज ठाकरे यांना नागपूरला येण्याचे आमंत्रणही दिले.