आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजसाहेब, गटनेत्यांच्या राजीनाम्याचे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-‘मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मगच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून लोकसभेच्या लढाईत उतरायला हवे होते’, हे वक्तव्य होते राजसाहेबांचे. त्यानंतर मनसेने लोकसभेसाठी उभ्या केलेल्या नऊ उमेदवारांमध्ये एक तर मनसेचे विधिमंडळातील गटनेते आहेत. मग तेच तत्त्व मनसेने त्यांच्या गटनेते असलेल्या बाळा नांदगावकर यांना का लागू केले नाही ? राजसाहेब, 9 मार्चला तुमचे उमेदवार खासदारकीला उभे करताना तुम्ही तुमचेच 9 जानेवारीचे विधान विसरलात का, की अशी वारंवार दुटप्पी भूमिका घेणे हीच ‘मनसे स्टाइल’ आहे, असे जनतेला वाटल्यास त्याला चूकदेखील कसे म्हणता येईल?
राजसाहेब 9 जानेवारीला नाशिक दौर्‍यावर आले असताना सोबत मुंबईचा मीडियादेखील होता. मीडियाला खमंग बातमीचा ‘खाऊ’ देणार असल्याचे सांगून त्यांना खास नाशकात आणले गेले होते. त्यावेळी ‘पंतप्रधानपदाचा उमेदवार बनल्यावर नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कारण पंतप्रधानपदाचा उमेदवार हा देशाचा असतो, एका राज्यापुरता र्मयादित नसतो’, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. मग हेच तत्त्व राजसाहेबांनी त्यांच्या उमेदवारांबाबत का लावले नाही, असा सवाल आता निर्माण झाला आहे. खासदारकीचा उमेदवार हा किमान पाच ते सहा विधानसभा मतदारसंघांचा असतो. मग त्याला एका विधानसभा मतदारसंघापुरत्या र्मयादित असलेल्या आमदारकी व विधानसभेच्या गटनेतेपदाचा राजीनामा देऊन मगच मैदानात का उतरवले गेले नाही, असा सवाल आता सर्वच स्तरावरून विचारला गेल्यास नवल नको. 9 जानेवारीला एक बोलायचे व त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी अंतिम 9 उमेदवारांची घोषणा करताना आपल्याच वक्तव्याचा विसर पडल्यासारखी भूमिका घ्यायची. सामान्य जनतेला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ची बाधा असली तरी ती इतकीही ‘शॉर्ट’ नाही की दोन महिन्यांपूर्वी काय बोलले होते ते आठवणार नाही.