आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा‘सायलेंट मूव्ही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेच्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याबद्दल पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक नेते-पदाधिकार्‍यांना ‘सायलेंट मूव्ही काढल्यानेच कदाचित ते बोलत नसावेत’, अशी कोपरखळी मारली. नाशिकला येण्यामागचे प्रयोजन सांगताना मनसे आणि नाशिककरांमधील संवाद कमी झाल्याची कबुली देत हा गॅप भरून काढण्यासाठीच वारंवार येणे अनिवार्य असल्याचे त्यांनी मंगळवारच्या (दि. 10) भेटीत स्पष्ट केले.
अडीच वर्षांपासून महापालिकेचा कारभार हाती असलेल्या मनसेकडून सुरुवातीच्या काळात नागरी विकासकामे न झाल्याने नाशिककर पक्षाबद्दल नाराज आहेत. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. त्यातच, अंतर्गत वाद आणि गटबाजीमुळे पदाधिकार्‍यांमध्येही दुफळी निर्माण झाल्याने त्याचा परिणाम संघटनेवर झाला. प्रशासनावर अंकुश न राहिल्याने विकासकामांबाबतही उदासीनता निर्माण होऊन मनसेने नागरिकांची अधिकच नाराजी ओढवून घेतली. यामुळे मध्यंतरी राज यांनी महापौरांसह सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांची नाशिकमध्ये हजेरी घेतली. मात्र, त्यानंतरही काही सुधारणा न झाल्याने राज यांनी पदाधिकार्‍यांना टाळत केवळ नगरसेवकांची मुंबईत बैठक घेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मीच प्रवक्ता अन् प्रदेशाध्यक्षही..
पक्ष आणि पक्षाच्या कामाविषयी कुणीच काही बोलत नसल्याने सध्या मीच प्रवक्ता आणि मीच प्रदेशाध्यक्ष असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोठून लढणार?
‘विधानसभा निवडणूक कोठून लढविणार’, या प्रश्नावर ‘तुम्हाला कोठून आवडेल’, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. निवडणुकांना अवकाश असल्याने नंतर निर्णय घेऊ, अशी पुस्तीही जोडली.
निधीची जबाबदारी शासनाचीच..
सिंहस्थाची विकासकामे करण्यासाठी निधी देण्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची आहे. राज्याकडून महापालिकेला एक छदामही मिळणार नसेल, तर नागरिकांवर कराचा बोजा वाढवून विकासकामे करायची का, असा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्य नागरिकांवर कराचा बोजा लादणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.