आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे संपर्काध्यक्ष ठोकणार नाशकात तळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर आता मनसेच्या पुनर्बांधणीसाठी संपर्काध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी 1 ते 10 जून असा तब्बल दहा दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून संघटनेच्या पुनर्बांधणीचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे नवनिर्माणासाठी मोठय़ा प्रकल्पांचे काम सुरू असताना महापालिकेतील रखडलेली नोकरभरती, रस्ते, पाणी, वीज व कचरा अशा मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करून मनसेला पुन्हा भरारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मनसेच्या राजगड येथील बैठकीनंतर अभ्यंकर यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. ते म्हणाले की, नाशिक महापालिकेची सत्ता मनसे-भाजपकडे असून, येत्या काळात मोठय़ा प्रमाणात कामे केली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी त्यामुळे खचून जाण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांची कामे करण्याचा प्रयत्न असेल. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते 10 जून या काळात नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, प्रत्येक प्रभागाचा दौरा करून तेथील समस्या व कोणती कामे करणे गरजेचे आहे, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. एकीकडे गोदापार्कसारखे मोठे प्रकल्प, चांगले रस्ते तयार केले जात असताना वीज, पाणी, शिक्षण, कचरा, आरोग्य अशा मूलभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित केले जाईल. प्रामुख्याने अशा कामांमधून लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न असेल. नाशिक महापालिकेत जवळपास पाच वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. दुसरीकडे रिक्त पदांची संख्या वाढत असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे नोकरभरतीही मनसेच्या अजेंड्यावर असणार आहे.

निरीक्षक नाही, फक्त मार्गदर्शक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बैठकीत अभ्यंकर यांनी मी काही निरीक्षक नाही व कोण कसे काम करते याचे रिपोर्टिंग ठेवण्यासाठी आलेलो नाही, असे स्पष्ट केले. संघटनेत कार्यक्षम पदाधिकारी असून, केवळ त्यांच्यात समन्वयक व मार्गदर्शकाची भूमिका बजावून संघटना वाढीसाठी प्रयत्न करेन. पक्षात प्रत्येकाने सक्रियपणे काम केले पाहिजे. अकारण पदे अडवणार्‍यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘राजगड’वर घेतला आढावा
अभ्यंकर यांनी बुधवारी मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी व विधानसभानिहाय प्रभाग पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. अनेकांशी स्वतंत्ररीत्या चर्चाही केली. शहर कार्यकारिणी बरखास्त केली असून, चर्चेदरम्यान नव्याने रचना करण्याची मागणीही करण्यात आली.

‘मिशन मुंबई’साठी तयारी
राज ठाकरे यांचा प्रभाव कमी झाल्याची टीका जिव्हारी लागल्यामुळे मुंबईतील सभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. वाहनाअभावी कार्यकर्ते पोहोचले नाहीत ही सबब चालणार नाही, असे सांगत जास्तीत जास्त वाहने नेण्यासाठी नगरसेवक व पदाधिकार्‍यांशी चर्चा झाली.

डॉ. पवार पुन्हा सक्रिय
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज असलेले डॉ. प्रदीप पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. अभ्यंकर यांच्यासमवेत त्यांनी बैठकीला हजेरी लावून कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतली. विशेष म्हणजे, अभ्यंकर यांनीही पराभवामुळे खचून न जाता संघटनेत कामासाठी डॉ. पवार यांनी जबाबदारी उचलल्याचे सांगितले.