आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलनाक्यांच्या कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार : राज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यातील टोलनाक्यांसंदर्भात एकदा ‘एक्सरसाईज’ झाली आहे. त्यामुळे पुन्हा तसे करण्याची वेळ शासनाने आणू नये. या एक्सरसाईजने आमची बॉडी फिट झाली आहे, त्यामुळे पुन्हा असे करण्याची गरज पडणार नाही. सरकारला आमच्या एक्सरसाईजची (ताकदीची) चांगलीच कल्पना आली असून, पुन्हा टोलनाक्यांचा मनमानी कारभार आणि सावकारी वसुलीविषयी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथे सांगितले.

शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि जळगाव महापालिकेत विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभासाठी राज नाशिक दौर्‍यावर आले आहेत. त्यावेळी मनसेच्या आंदोलनानंतर नाशिक जिल्ह्यातील टोल प्रकल्पांचे दर अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आल्याचा पोलखोल ‘दिव्य मराठी’ने 4 सप्टेंबर रोजी केला. याबाबत राज यांना विचारले असता टोलनाक्यांच्या मनमानी कारभाराविषयी चार-पाच महिन्यांपासून न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, अजूनही ही केस बोर्डावर आलेली नाही की त्यावर सुनावणीदेखील झाली नाही. त्यामुळे याबाबत बोलताना ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ झाला तरी काही फरक पडत नाही. न्यायालयाने न्याय द्यावा, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पयरूषण पर्वकाळात प्रथमच कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी काढण्यामागची भूमिका विचारली असता कॉँग्रेसचेच हे उद्योग असून, आयुक्तांच्या माध्यमातून आदेश काढण्याचे आत्ताच त्यांना का सुचले, असा प्रश्न उपस्थित करत राज म्हणाले, श्रावण महिन्यात अशा स्वरूपाचे आदेश का काढले नाहीत. म्हणजेच एखाद्या विशिष्ट समाजाची मते मिळविण्यासाठी अशा प्रकारचे मतलबी आदेश काढायचे आणि राजकारण करायचे एवढेच कॉँग्रेसला कळते. कॉँग्रेसने नको तिथे खोडा घालू नये. यामागे कुणाची तरी चाल असू शकते. मात्र, आमचा या मतलबी आदेशाला विरोधच आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले. मदरसांना 10 कोटी निधीबाबत भूमिका मांडताना राज यांनी यातही कॉँग्रेसचे मतांचे राजकारण असल्याचे सांगत निवडणुका आल्या की कॉँग्रेसला असल्याप्रकारचा फंडा सुचतो, अशी टीका त्यांनी केली.