आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांचा आजपासून नाशिक दौरा, अंतर्गत गटबाजीचा कसा सोडवणार तिढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘एलबीटी’मुळे सध्या महापालिका आर्थिक मंदीत सापडली आहे. त्याचबरोबर अनेक ठराव मागच्या दाराने येण्याबरोबरच काही योजनांच्या खासगीकरणाच्या निर्णयांमुळे मनसेची सत्ता विरोधकांच्या कैचीत सापडली आहे. आधीच आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करणार्‍या सत्ताधार्‍यांना काही घरभेद्यांचाही सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 23) सायंकाळी नाशकात येत असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या दोन दिवसांच्या मुक्कामात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्तेवर येण्यासाठी राज यांनी नाशिककरांना अनेक आश्वासने दिली. यामुळे आशा-आकांक्षा वाढलेल्या असतानाच सत्ताधार्‍यांकडून मात्र सभागृहाच्या विरुद्ध निर्णय घेतले जात असल्याने विरोधकांकडून मनसेवर सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण असो की घंटागाडी योजनेचा विषय असो, या सर्व प्रकरणांत सभागृहात विरोधकांसह मनसेच्या सदस्यांनीदेखील या योजना पालिकेने राबविण्याची भूमिका घेतली. महापौरांकडून मात्र त्याच्या उलट निर्णय घेतला गेला, अशी टीका होत असताना महापौरांनी प्रभागनिहाय नव्हे, तर विभागनिहाय घंटागाडीचा निर्णय घेतला. यासंदर्भात खुद्द गटनेत्यासह पाच नगरसेविकांनी मागील आठवड्यात या योजनेला हरकत घेत महापौरांना पत्र लिहिले होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणावर समझोत्याने पडदा टाकला गेला. जकातीचे खासगीकरण रद्द करणार्‍या मनसेनेच तारांगण प्रकल्प, खतप्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केल्याने विरोधकांच्या टीकेला मनसेला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक पातळीवर समन्वय नाही
राज ठाकरेंपर्यंत पोहोचू दिले जात नसल्याचा आरोप करत मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे मध्यंतरी शिवसेनेत दाखल झाले. त्यावरूनही शिवसेना-मनसे असा सामना रंगला. त्यात गोडसे यांनी आमदार तथा सरचिटणीस वसंत गिते यांच्यासह अनेकांवर शरसंधान साधले. स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने अंतर्गत गटबाजीचे दर्शनही मनसेत होऊ लागले आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दौर्‍यात याच मुद्यांवरून राज यांनी पदाधिकार्‍यांना धारेवर धरत एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला होता.