आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Lok Sabha Election, Nashik

नव्या मुद्यांअभावी राज ठाकरे यांच्या दोन सभांना कात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज ठाकरे यांचे वक्तृत्व हा मनसेचा एकखांबी तंबू असताना आता मात्र कुठले नवे मुद्दे घेऊन पुन:पुन्हा मतदारांसमोर जायचे या प्रश्नाचे नेमके उत्तर न मिळाल्याने राज यांच्या येथील प्रस्तावित दोन सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. घोटी व पवननगर येथील सभांपाठोपाठ 10 तारखेला राज यांच्या नाशिकरोड व यशवंत महाराज पटांगण अशा दोन सभांचे नियोजन होते. तथापि आता त्याऐवजी अंतिम टप्प्यात थेट गोल्फ क्लब मैदान आणि सिन्नर येथेच सभा होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजते.


शिवसेनेनंतर नाशिकचा बालेकिल्ला मनसेच्या ताब्यात आहे. राज आणि नाशिकचे सख्यही ते शिवसेनेत असल्यापासूनच आहे. यामुळे तसे पाहिल्यास त्यांची नाशिक भेट आणि इथे होणार्‍या सभा नाशिककरांना तशा नवीन नाहीत. तरीही नाशिककर त्यांच्या प्रत्येक सभेला येतात. सात वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केल्यानंतर नाशिककडे त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. सरचिटणीस पदही त्याच अनुषंगाने नाशिकला दिले गेले. महापालिकेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये मनसेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या पक्षाकडून नागरिकांनी अपेक्षांची झोळी मोठी केली होती. पण, नाशिककरांच्या या झोळीत अद्यापतरी काहीच आलेले नाही. आधी शिवसेना, त्याआधी असलेल्या कॉँग्रेसप्रमाणेच मनसेचीही वाटचाल राहिली. यामुळे सुतासारखे सरळ करण्याची भाषा करणार्‍या मनसेच्या पदरी नागरिकांच्या निराशाच जास्त पडल्या. अशा स्थितीतच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जात आहे. यामुळे त्याचा मुकाबला करताना मनसेच्या तोंडी फेस येऊ लागला आहे. त्याचा प्रत्यय नाशिकमध्ये 5 एप्रिलला झालेल्या जाहीर सभेत आला. बोलण्यासारखे फारसे नवे मुद्देही राज यांच्याकडे नसल्याचे भाषणातून जाणवले. त्याचप्रमाणे मनसेच्या हाती असलेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने विकासकामांवर येत असलेल्या मर्यादाही स्पष्ट करण्यावर त्यांनी भर दिला.


महाराष्ट्रात दहा ठिकाणी मनसेचे उमेदवार असून, त्यांच्यासाठी राज यांच्या सभांचे नियोजन पक्षातर्फे झाले होते. त्यानुसार बालेकिल्ला असलेल्या नाशकात डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी पाच सभा राज घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा, खासदारांची कामे काय, गारपीटग्रस्त भागाची पाहणी दौरा, परप्रांतीय असे तेच ते मुद्दे सोडल्यास अन्य नवे मुद्दे तूर्त हाती नसल्याने भाषणात तोच तो पणा येण्याचा संभव आहे. त्यामुळेच यशवंत महाराज पटांगण आणि नाशिकरोड येथे होऊ घातलेल्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्याचे पक्षाच्याच एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले. स्वत: राज यांनीही मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली. या चर्चेअंती आता सिन्नर आणि गोल्फ क्लब मैदानावर सभा होणार आहेत.