आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षाने का होईना विकासकामांचा होणार श्रीगणेशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रस्त्यांवरील खड्डे आणि इतर नागरी कामांविषयी जनमानसातून मनसेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी किंबहुना नाशकातील विविध विकासकामांचा श्रीगणेशा करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. यामुळे खर्‍या अर्थाने दीड वर्षांनी का होईना या कामांच्या माध्यमातून काहीअंशी तरी नागरिकांची नाराजी दूर करता येईल का, याचा कानोसा घेतला जाणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक पालिकेच्या सत्तेच्या चाव्या मनसेने मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत आपल्याकडे खेचून आणल्या. यामुळे दिलेल्या आश्वासनांप्रमाणे अनेक बदल नाशिककरांना अपेक्षित असले तरी दीड वर्षात त्याची चुणूकदेखील पाहावयास न मिळाल्याने विरोधकांसह नागरिकांमधूनही मनसेविषयी नाराजीचा सूर निर्माण झाला. त्यात पावसाळ्यामुळे रस्त्यांचे खरे स्वरूप उघडे पडले व मनसेला या रोषाला आणखीनच सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही राज यांचे नाशिकला अनेक दौरे झाले. मात्र, गोदावरी पार्क व वाहतूक व्यवस्था यासह काही ठराविक विषयांपुरतेच हे दौरे सीमित राहिले. या दौर्‍यांमध्ये त्यांनी दोनदा सहा महिन्यांमध्ये नाशिकचे रूप पालटलेले दिसेल, अशा स्वरूपाचे आश्वासन माध्यमांसमोर बोलताना दिले होते. मात्र, त्यानंतरही विकासकामांविषयी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

पदाधिकार्‍यांशीही हितगुज
या दौर्‍यात राज ठाकरे आपल्या पदाधिकार्‍यांशी हितगुज साधणार आहे. आगामी नियोजन आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांविषयी ते आढावा घेणार असून, महापालिका अधिकार्‍यांकडूनही ते कामांचा आढावा घेणार आहेत.

नगरसेवकांचा नाराजीचा सूर
सत्ता आल्यापासून दीड वर्षात राज नाशिकला अनेकदा येऊन गेले. मात्र, त्यांनी मनसेच्या नगरसेवकांशी पाच मिनिटेही संवाद न साधल्याने सर्वच नगरसेवकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. किमान या दौर्‍यात राज आमच्याशी संवाद साधणार का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिक पॅटर्नसाठी मनसेचे प्रयत्न
नाशिक पालिकेच्या रूपाने मनसेला पहिली सत्ता प्राप्त झाल्याने विकासकामांबाबत राज ‘नाशिक पॅटर्न’ निर्माण करतील, असे बोलले जात होते. मात्र, हा परिणाम साधता न आल्यानेच तसेच मनसेविषयी नाराजी निर्माण झाल्यानेच ती दूर करण्यासाठी आता राज यांच्या दोन दिवसीय दौर्‍यात 50 ते 55 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा श्रीगणेशा होणार आहे. त्यात आमदार वसंत गिते यांच्यासह काही नगरसेवकांच्या प्रभागातील वाचनालय, सभागृह, महिला वसतिगृह, रस्ते डांबरीकरण अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.