आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘.अन्यथा राज यांना काळे झेंडे दाखवू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - येथील प्रभाग 58 मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने काम पूर्ण झाल्याशिवाय राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येऊ नये. अन्यथा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा मनसेवगळता इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

प्रभाग सभापती सुनीता कोठुळे, सूर्यकांत लवटे (शिवसेना), सुनील वाघ, ललिता भालेराव (आरपीआय), वैशाली दाणी, शोभा आवारे, हरीश भंडागे (राष्ट्रवादी), कन्हय्या साळवे (काँग्रेस) यांनी प्रभाग सभापतींच्या दालनात मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. वर्षापासून येथील प्रभागात छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून, पालकमंत्री छगन भुजबळ व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. काम पूर्ण होण्याची निश्चित तारीख कळविल्यास सन्माननीय पाहुण्यांची वेळ घेऊन त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडता येईल, या आशयाचे पत्र दाणी व वाघ यांनी आयुक्तांना दिले. मात्र, पुतळा परिसरात स्वच्छता सुरू असल्याने, माहिती घेतली असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे समजले. काम अपूर्ण असताना पुतळा उद्घाटनाचा प्रयत्न करू नये; अन्यथा सर्वपक्षीय नगरसेवक सोहळ्यावर बहिष्कार टाकून ठाकरेंना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवतील, असा इशारा देण्यात आला.