आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रीम प्रोजेक्ट गोदापार्कचा 'राज ठाकरे' यांनी केला गजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकची आणखी एक वारी करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारच्या ताज्या भेटीतही त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचा पुन्हा एकदा गजर केला. दहा दिवसांत दुस-यांदा शहरात आलेल्या राज यांनी गोदापार्कचा एक किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठीच वर्षभराचा कालावधी लागेल, असे सांगितल्याने प्रकल्पाची संथ चाल आपोआपच स्पष्ट झाली. या कालावधीचा विचार करता चार टप्प्यांतील कामासाठी सुमारे चार वर्षे लागण्याची अटकळ बांधली जात आहे. गेल्या दौ-यात स्थानिक पदाधिका-यांचे काम म्हणजे ‘सायलेंट मूव्ही’ असल्याचे सुनावणा-या राज यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत शहरात ठोस काम झाल्याचे दाखवून द्यायचे असल्याचे त्यांच्या संघटनात्मक बांधणीच्या प्रयत्नांतून स्पष्ट झाले आहे. मात्र, गोदापार्क पूर्णत्वास येण्यास बराच काळ लागणार असल्याचे गुरुवारी त्यांनीच सूचित केल्याने नाशिककरांना हा प्रकल्प साकारलेला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाल्यानंतर राज यांनी वेळीच सावरत नाशिककडे लक्ष केंद्रित केले. यापूर्वी दोन-दोन महिने नाशिककडे न फिरकणारे राज केवळ दहा दिवसांच्या काळात दुस-यांदा शहरात आले. विधानसभा निवडणुकीत सर्वशक्तिनिशी उतरण्याची तयारी करणा-या राज यांनी गुरुवारी गोदापार्कची पाहणीही केली. आसारामबापू पुलाजवळील छोट्याशा उद्यानालगत असलेल्या गोदापार्कच्या कामाचे अवलोकन करून काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी केल्या. नेहमीप्रमाणे पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी विकासाच्या योजनांवर भाष्य केले. ‘गोदापार्क प्रत्यक्ष साकारल्यानंतर बघण्याची रंगतच काही और असेल’, असे म्हणणा-या राज यांना ‘पहिल्या टप्प्यासाठी किती वेळ लागेल’, असे विचारल्यावर त्यांनी ‘घाई कशाला’ अशी मिश्किली करीत ‘एक वर्षाचा वेळ लागेल’, असे स्पष्ट केले. त्यापुढील तीन टप्प्यांचा मार्ग आणखी खडतर असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई होळकर पूल ते रामकुंडाच्या टप्प्यात गोदापार्क करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांवर लक्ष
राज यांनी नगरसेवकांना प्रभागात फलकांसह स्वत: व सहाय्यकांचे भ्रमणध्वनी क्रमांक लावण्याचे आदेश दिले. नगरसेवकांनी दुर्लक्ष केले तर दाद मागण्यासाठी पक्षस्तरावरही काही व्यवस्था करता येईल का, यावरही विचार होणार आहे.
समस्यांसाठी स्वतंत्र पोर्टल
शहराचे सर्वेक्षण करून समस्यांसंदर्भात दाद मागण्यासाठी एखादे पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे दैनंदिन समस्या चुटकीसरशी सुटतील. एका संस्थेने त्यासाठी प्रोजेक्टही तयार केला असून संबंधितांशी चर्चा बाकी असल्याची माहिती राज यांनी दिली.
राजबाबूंच्या पोतडीतील या आहेत नवीन योजना
शिवाजी उद्यान : शहराच्या मध्यवर्ती भागात शिवाजी उद्यानाच्या रूपाने उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग कसा झाला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करीत उद्यानाचे महिंद्रा अँड महिंद्राच्या मदतीने नूतनीकरण करण्याबाबत राज यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली.
वायफाय नाशिक : याआधी गंगापूररोड वायफाय करण्याची संकल्पना सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी मांडली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता संपूर्ण शहर वायफाय करण्याचा विचार असल्याचे राज यांनी सांगितले.
वाहतुकीसाठी ट्रॅम : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी शहरात ट्रॅम सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मोनो रेल, बीआरटीएस नाशिकमध्ये अशक्य असल्याचे सांगत राज यांनी त्याबाबतही चाचपणी केली.
फाळके स्मारक : महापालिकेकडून फाळके स्मारकासारखे प्रकल्प चालवणे शक्यच नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. फाळके स्मारक खासगीकरणातून विकसित केले तरच हा प्रकल्प तग धरेल, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.