आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षेचे पाच तास अन् शक्तिप्रदर्शनही खास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पक्षाध्यक्ष राज ठाकरे दुपारी 12 वाजता येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या मनसेच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रविवारी तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतरही ठाकरेंच्या स्वागतप्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. दरम्यान, मनसेतील नाराज आमदार वसंत गिते यांच्या अनुपस्थितीनंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्नही यातून लपून राहिला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांच्या दोन महिन्यांतील हा चौथा दौरा असून, रविवारी दुपारी 12 वाजता ते नाशिकमध्ये दाखल होणार होते. यापूर्वी ठाकरे यांचे स्वागत मुंबई नाका येथे जल्लोषात केले जात असे. त्यावेळी ते प्रदेश चिटणीस अतुल चांडक यांच्या निवासस्थानी मुक्कामी थांबत होते. मात्र, काही घडामोडींनंतर ठाकरे यांनी विर्शामगृहावरच मुक्कामास पसंती दिली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या स्वागतासाठी रविवारी शासकीय विर्शामगृहावर नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जमली. प्रथम ठाकरे दुपारी 12 वाजता येणार, असा निरोप आला. त्यानंतर तासागणिक वेळेत बदल होत 5.30 वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. या काळात महिला पदाधिकार्‍यांनी गप्पांचा फड रंगवला. स्थायीच्या सभापतिपदावर निवड झाल्यानंतर राहुल ढिकले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदार उत्तमराव ढिकले व नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
गिते यांच्या पक्षांतराची चर्चा
नाराज असलेले आमदार वसंत गिते हे शिवसेना किंवा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वतरुळात सुरू होती. त्यादृष्टीने मनसेच्या नेत्यांकडून अंदाज घेतला जात होता. मात्र, गिते यांच्याकडून असे कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते.
दुखर्‍या नसेमुळे गिते अनुपस्थित
मनसेत अस्वस्थ असलेले आमदार वसंत गिते हे राज यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. गितेंचे निकटवर्तीय पदाधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेत अधिकच रंग भरला. दरम्यान, गिते हे पायाच्या दुखर्‍या नसेवरील शस्त्रक्रियेमुळे अनुपस्थित असल्याचे काही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.