आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Modifaying MNS; Changes Take Place All Over The State

मनसेत संघटनात्मक पातळीवर राज्यभर होणार फेरबदल, राज ठाकरेंकडून संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले असून, तत्पूर्वी आमदार व प्रदेश पदाधिकार्‍यांना ‘दत्तक’ दिलेल्या जिल्ह्यांचे दौरे करून संभाव्य फेरबदलांची चाचपणी करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

मार्च महिन्यात राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा संपला. त्यानंतर राज्यभरात मनसेची झालेली घोडदौड, जिल्ह्याप्रमाणेच तालुकानिहाय परिस्थितीत, आगामी धोरण व पक्षाची भूमिका याबाबत पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्याकरिता मुंबईत बैठक झाली. जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर ठाकरे यांनी सर्वप्रथम प्रत्येक पदाधिकारी व आमदारांनी घेतलेल्या ‘दत्तक’ जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्याचे आदेश दिले. त्यासाठी पुन्हा जिल्हा दौरे करून त्याचा अहवाल नाशिकमधील पक्षाचे मुख्यालय असलेल्या राजगडावर सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे स्वत: फेरबदलांबाबत निर्णय घेतील, असे एका आमदाराने खासगीत सांगितले.

नाशिकमध्येही खांदेपालट- नगरसेवक हेमंत गोडसे यांनी मनसेच्या संघटनात्मक पातळीवरील पक्षपातीपणाबद्दल तक्रारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. अर्थात नाशिकमधील फेरबदल नियमित स्वरूपातील असल्याचे काही पदाधिकार्‍यांचे म्हणणे असून, याचा गोडसे यांच्या आरोपाशी यत्किंचितही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. खासकरून जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांच्या नियुक्तीत बदल होण्याची शक्यता आहे.

गोडसेंवरील कारवाईवर पडदा- हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चाच झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गोडसे यांच्या आरोपावर योग्य वेळी उत्तर देईन, असे सांगत राज ठाकरे यांनी पडदा टाकल्याचे एका पदाधिकार्‍याने सांगितले.


तीन दिवस नाशिक दौरा- 18 ते 20 जून दरम्यान राज ठाकरे यांचा तीन दिवसीय नाशिक दौरा जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी व महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते.