आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतील नाराजांच्या मनोमिलनाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने मनसेतील गटबाजी उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रविवारपासून सुरू होत असलेला दोनदिवसीय दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौ-यानिमित्त मनसेतील नाराज नेते आमनेसामने येणार असून, त्यांच्या मनोमिलनासाठी ठाकरे काय करतात, याकडेही नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे निकटवर्तीय असलेल्या अविनाश अभ्यंकर यांनी संपर्कप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शहर पिंजून काढत मनसेला नवी दिशा देण्यासाठी धडपड सुरू केली आहे. अभ्यंकर यांनी मनसेच्या अपयशाची कारणे जाणून घेतानाच नगरसेवकांची मोट बांधली. त्यामुळे पक्षातील जुने नेतेही ओघानेच दुखावले असून, खास करून स्थायी समिती सभापतिपदासाठी राहुल ढिकले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही नेत्यांनी एकप्रकारे अंगच काढून घेतल्यासारखी परिस्थिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही गटबाजी अत्यंत धोकेदायक ठरू शकणार असल्याने, आता राज यांच्या दोनदिवसीय दौ-यात नेमका कसा समेट होतो, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीचे सभापतिपद मनसेकडे आल्यानंतर झालेल्या जल्लोषातही अनेक नेते फिरकले नव्हते. त्यामुळे आता राज यांच्या दौ-यात तरी नाराज नेते एकत्र येतात का, हे बघणे रंजक ठरेल.

तज्ज्ञांबरोबर देणार भेटी
गोदापार्कबरोबरच खत प्रकल्प, पेलिकन पार्कच्या खासगीकरणाबाबत राज हे चाचपणी करण्याची शक्यता आहे. संघटना बांधणीसाठी त्यांची पदाधिका-यांबरोबर बैठकही होणार आहे. त्याबरोबरच फाळके स्मारकाचा कायापालट करण्यासाठी तज्ज्ञांबरोबरच चाचपणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.