आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात कसे करणार नवनिर्माण... मनसे नगरसेवकांचा पुण्याला अभ्यास दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे शहरातील नागरिकांमध्ये मनसे विरोधात रोषाचे वातावरण असताना, दुसरीकडे नागरी समस्यांशी संबंधित किरकोळ विकासकामांच्या फायली अडविण्याचे प्रकार सुरू आहेत. ‘गार्डन सिटी’च्या स्वप्नाला चाप लागला असून, उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे देयकांअभावी थांबली आहेत.
बंद पथदीपांवर ‘एलईडी’च्या नावाखाली दुर्लक्ष केले जात असून, आता लोक चक्क स्वखर्चातून नगरसेवकांना साहित्य आणून देत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कसे करणार नवनिर्माण, अशी हतबलता मनसे नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतर राज यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो, असे सांगत नगरसेवकांना आश्वस्त केले.

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. गेडाम यांनी आर्थिक परिस्थिती बघून कामे मंजूर करण्याचे धोरण जाहीर केले. त्यामुळे नगरसेवकांच्या दोन ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या किरकोळ विकासकामांच्या फायलींना ब्रेक लागला. त्याविरोधात मनसेचे नगरसेवक ठाकरे यांच्यासमोर आक्रमक झाले. गटनेते अशोक सातभाई यांनी प्रस्तावना करून नगरसेवकांना मन मोकळे करण्याचे आवाहन केले.
प्रस्तावित कामे तर सोडा, मात्र ज्या कामांचे कार्यारंभ आदेश जारी झाले. अर्थातच वर्कऑर्डर झाली त्यांनाही स्थगिती देण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. अर्चना थोरात सुजाता डेरे यांनी गार्डन सिटीसाठी प्रयत्न सुरू असताना सद्य:स्थितीतील उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी बचतगट वा कंत्राटदारांना दिलेली कामे बंद पडल्याचे सांगितले. संबंधितांची देयके प्रलंबित असून, भविष्यात देखभालीची कामे सामाजिक संस्थांना सामाजिक बांधिलकी म्हणून विकसित करण्यासाठी देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. सुदाम कोंबडे, गणेश चव्हाण, स्थायी समितीचे सभापती अॅड. राहुल ढिकले यांनी पाणीपुरवठा विभागाची तरतूद संपल्यामुळे जलकुंभाची कामे बंद पडल्याचे लक्षात आणून दिले.
अनेक प्रभागांत ३० वर्षे जुन्या जलवाहिन्या असून, त्या बदलण्याची कामे होत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप होत असल्याचे यशवंत निकुळे यांनी लक्षात आणून दिले.

‘एलईडी’ प्रकरणी संशयास्पद भूमिका
नगरसेवकांनी ‘एलईडी’ पुरवठादाराकडून निकृष्ट साहित्य पुरविले जात असून, कंत्राटातील अटी-शर्तींचे उल्लंघन होत असल्याकडे लक्ष वेधले. ‘एलईडी’ रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करून निर्णय घेणे शक्य आहे. मात्र, प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात असल्यामुळे शहर अंधारात आहे. ‘एलईडी’ प्रकरणी प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद असल्याची तक्रारही बहुसंख्य नगरसेवकांनी या वेळी केली. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये वाढती नाराजी असून, अनेक भागात पथदीप नसल्यामुळे लोक आता चक्क स्वखर्चातून दिवे आणून नगरसेवकांच्या हातात टेकवत असल्याचेही सांगण्यात आले.
राज ठाकरेंकडून नगरसेवकांची हजेरी
‘राजगड’येथील बैठकीला अनेक नगरसेवक उशिराने आल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेत त्यांनी खडसावल्याचे सांगितले जाते. मुळात नाशिक येथील बैठकीसाठी राज यांनी भल्या पहाटेपासूनच तयारी केली. सहा वाजता मुंबईतून निघून ते दहा वाजेपर्यंत नाशिकमध्ये दाखल झाले. माजी आमदार नितीन भोसले यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे त्यांचीही ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर ‘राजगड’ येथील बैठकीसाठी राज हजर झाले. मात्र, अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. काही नगरसेविकांचे पती हजर होते. मात्र, राज यांनी नगरसेविका कोठे आहेत, असे विचारत झेरॉक्स चालणार नाही, असेही सुनावले. त्यामुळे बैठकीतून नगरसेविकांचे पती दूर राहिले.
चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न
पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या काही भागात चोवीस तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था असून, त्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या काही प्रभागांत योजना राबवता येईल का, याची चाचपणी राज यांनी आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत केली. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून निवृत्त झालेल्या एका अभियंत्याचीही मदत घेण्यात आली. फाळके स्मारक पुनर्निर्माण, बोटॅनिकल गार्डनचा विस्तार आदी कामांचाही आयुक्तांसमवेतच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
‘जम्बो बजेट’ला लागणार कात्री
दरम्यान,आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही राज यांच्यासमोर महापालिकेची आर्थिक स्थिती कशी नाजूक आहे, याची माहिती ठेवल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीप्रमाणे उत्पन्नाचे स्रोत घटल्यामुळे केवळ महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीवर ठेवलेल्या १८०० कोटींचे अंदाजपत्रकच मंजूर होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती महासभेने वाढ करून ते तीन हजार कोटींपर्यंत पोहोचवले. आजघडीला महापालिकेच्या भांडवली खर्चासाठी ३९२ कोटी रुपयांची तरतूद होती. त्यातील २१३ कोटी शिल्लक आहेत. १७९ कोटींची देयके महापालिकेने अदा केली असून, चालू कामांसाठी २८२ कोटी लागणार असल्यामुळे उपलब्ध तरतूद लक्षात घेता ६९ कोटींचे दायित्व महापालिकेवर येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी प्राधान्याची कामे सुचवून त्यावर निर्णय घ्यावा, असे ठरले.
पुणे महापालिकेचे माजी गटनेते तथा मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या नगरसेवकांना प्रभागात बायोगॅसपासून तर वीजनिर्मिती करण्यापर्यंत कशा उपाययोजना केल्या, याचे प्रात्यक्षिक दाखविले. या विजेद्वारे प्रभागातील पथदीपही उजेड देतात, असे दाखवले. त्याबरोबरच सर्वधर्मीयांसाठी बनविलेल्या सामायिक स्मशानभूमीच्या कामालाही मनसे नगरसेवकांनी दाद दिली. पुढील आठवड्यात वेळ काढून मनसेच्या सर्व नगरसेवकांना पुण्यातील ‘नवनिर्माण’ दाखवण्याचा मनोदय राज यांनी व्यक्त केला.