आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Visit In Nashik For 4 Days From Tomaarow

मनसे अध्यक्ष उद्यापासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असताना किरकोळ कामेही होत नसल्याच्या कैफियती बरोबरच आयुक्तांकडून होणाऱ्या कथित अडवणुकीचे गाऱ्हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडण्याचा निर्णय पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आहे. शनिवार(दि. ३)पासून राज चार दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी नगरसेवक एकत्रितरीत्या प्रलंबित कामांची माहिती केलेल्या पाठपुराव्याचे पुरावेही सादर करणार आहेत.
महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कामांना प्राधान्य आर्थिक शिस्त लावण्याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार, विभागनिहाय मंजूर तरतूद, शिल्लक रक्कम प्राधान्यक्रम असलेली कामे निश्चित करूनच खर्च करण्याचे निर्देश खातेप्रमुखांना दिले. शहरात सिंहस्थाची मोठी कामे सुरू असल्यामुळे नगरसेवकांच्या किरकोळ कामांच्या फायली बाजूला पडल्या आहेत. त्यातच मध्यंतरी वाढीव डीएसआर अर्थात बांधकामासाठी जिल्हा दरसूचीत १० टक्के वाढ झाल्यामुळेही अनेक फायली नामंजूर झाल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
दोन ते पाच लाखांच्या नगरसेवक निधीतील कामेही लोकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहेत. त्यात छोटे रस्ते, किरकोळ दुरुस्ती, काँक्रिटीकरण, शौचालय दुरुस्ती अशा कामांचा समावेश आहे. छोटी कामेच होत नसल्यामुळे प्रभागातील नागरिक रोष व्यक्त करत असल्याने त्याचा फटका पक्षाला भविष्यात बसेल, अशी भीतीही नगरसेवक व्यक्त करीत आहेत. ही सर्व परिस्थिती राज यांच्या कानावर घातली जाणार असल्याचे मनसे नगरसेवकांनी सांगितले.

‘भाजप कनेक्शन’चा धोका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात गेडाम हे ‘त्यांचा चॉइस’ असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री आयुक्त दोघेही नागपूरचे असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाणीवपूर्वक मनसेची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची भीतीही नगरसेवक ठाकरे यांच्याकडे व्यक्त करणार असल्याचे समजते.
यापूर्वी काँग्रेसने आयुक्तांची नियुक्ती रखडवून मनसेची कोंडी केली, तर आता भाजप त्याच्या उलट खेळीद्वारे मनसेला धक्का देण्याचे मनसुबे आखत असल्याची जाणीवही ठाकरे यांना करून देणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दौऱ्यात आयुक्तांबरोबर शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्पांना भेट देणारे राज याबाबतीत काय तोडगा काढतात, याची उत्सुकता आहे.
नगरसेवक म्हणतात, अनेक फायली पडून
^महापालिकेत किरकोळ कामांच्या मंजुरीसाठी नगरसेवकांना मोठा त्रास होत आहे. अनेक कामांच्या फायली पडून असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नगरसेवक गाऱ्हाणे मांडणार आहेत. आयुक्त कामे मंजुरीत अडचणी आणत असल्याची नगरसेवकांची प्रमुख तक्रार आहे. अशोक सातभाई, गटनेता,मनसे
लोकांनीच आणला बल्ब, पण कर्मचाऱ्यांना सवड नाही...
मनसे नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रभागातील विनयनगर भागात बंद पथदीपामुळे नागरिक त्रस्त आहेत. निकुळे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही विद्युत विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर स्थानिक नागरिक संतोष खैरनार यांनी फोन करून ‘आपण बल्ब (दिवा) आणला असून, तो बसवण्यासाठी कर्मचारी पाठवा’, अशी तक्रार केली. त्यानंतर निकुळे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आयता दिवा बसवण्यासाठीही ‘कर्मचारी वेळ काढूनच येतील’, असे उत्तर मिळाल्याची कैफियत त्यांनी मांडली.