आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या मनसेचे राज्यात पानिपत; मुंबईत 7 जागांवरच समाधान, ठाण्यात भोपळा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यासह मुंबईतही अपेक्षेनुसारच मनसेचे पानिपत झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २१ जागांची वजावट होऊन मुंबईत मनसेला यंदा फक्त सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे २००७ सालच्या निवडणुकीतही मनसेला सातच जागा मिळाल्या होत्या. गेल्या महापालिका निवडणुकीत दादर, माहीम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील सहाच्या सहा जागा जिंकणाऱ्या मनसेचे यंदा मात्र सहाही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
 
याशिवाय शिवसेना आणि भाजपला मुंबई महापालिकेत मिळालेल्या जागा पाहता सत्तास्थापनेसाठीही मनसेचा फारसा उपयोग होण्याची शक्यता नसल्याचेही या निकालाने स्पष्ट झाले आहे. 
 
गेली पाच वर्षे पूर्णत: निष्क्रिय राहिलेले पक्षनेतृत्व, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा केलेला अपयशी प्रयत्न आणि उशिराने सुरू झालेला पक्षाचा प्रचार या सर्व बाबींमुळे मनसेची एकूणच दहा महापालिकांतील कामगिरी कमालीची खालावली आहे. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे दहा महापालिकांमध्ये ११२ नगरसेवक निवडून आले होते. यंदा ती संख्या अवघी १८ वर आली आहे. वास्तविक पाहता मनसेच्या या कामगिरीचा अंदाज पक्षनेतृत्वाने अगोदरच बांधला होता.
 
 मात्र, दादर, माहिम या पट्ट्यातील सहापैकी किमान तीन नगरसेवक पुन्हा निवडून येतील, हा मनसेचा अंदाज मात्र साफ चुकला. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या प्रभागात मनसेचा विजय हमखास मानला जात होता. मात्र, या प्रभागात देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. विशेष म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मनसेच्या २८ नगरसेवकांपैकी माजी गटनेते दिलीप लांडे हे एकमेव नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत.   
 
ठाण्यात मनसेला भोपळा  
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सक्रिय झालेल्या राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे सादरीकरण करत प्रचारात थोडाफार प्राण फुंकला होता. मात्र, त्यांनी केलेल्या आवाहनाकडे मतदारांनी साफ पाठ फिरवल्याचे महापालिकांच्या निकालांमधून स्पष्ट झाले.  ठाण्यात गेल्या वेळी मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. तिथे मात्र यंदा मनसेची पाटी पूर्णत: कोरी राहिली आहे.
बातम्या आणखी आहेत...