आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Visit : Five Hours Late Arriaval In Nashik , Mayor Staying At Mumbai Naka

राज यांचा दौरा : पाच तास उशिराने नाशिकमध्ये आगमन, महापौरांचा मुंबई नाक्यावर तळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मंगळवारी दुपारी ठीक 4 वाजता राजसाहेब मुंबई नाक्यावर येतील, त्यांच्या स्वागतासाठी तमाम मनसैनिकांनी हजर राहावे, अशा ‘राजगडा’वरील फर्मानाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल पाच तासांची प्रतीक्षा महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व मनसैनिकांना करावी लागली. रात्री 9 च्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर नेहमीच्या दिमाखात पण अवघ्या मिनिटभरात स्वागतसोहळा पार पडला. त्यानंतर साहेब तडक शासकीय विर्शामगृहाकडे आरामासाठी रवाना झाले अन् कार्यकर्त्यांनी घरचा रस्ता धरला.

राज यांच्या महाराष्ट्र दौर्‍याचा एक भाग म्हणून गुरुवारी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी 4 वाजता नाशिकमध्ये दाखल होऊन त्याचदिवशी पदाधिकार्‍यांची बैठक व दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी पालिकेचे आयुक्त, नगरसेवकांची बैठक घेऊन वर्षभरात केलेल्या कामांविषयी ठाकरे झाडझडती घेणार असे सांगण्यात आले होते. ठाकरे यांचे दुपारी 4 वाजता मुंबई नाक्यावर आगमन होणार असल्याचे फर्मान निघाल्यामुळे पालिकेतून दुपारी 2 वाजताच मनसेच्या अनेक नगरसेवकांनी सुटी घेतली. दुपारी 3 ते 5 हा कालावधी समस्या घेऊन येणार्‍या नागरिकांचा असतानाही महापौर यतिन वाघ यांनादेखील मुंबई नाक्याकडे प्रयाण करावे लागले. तथापि तब्बल पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे यांचे रात्री 9 वाजता मुंबई नाका येथे आगमन झाले. त्यानंतर मनसेच्या नेत्यांना राज यांच्याशी रात्री चर्चा करण्याची संधी मिळाली.
बुधवारी बैठका, पक्षप्रवेशही

बुधवारी सकाळी महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याशी राज ठाकरे यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मनसेचे आमदार, पदाधिकारी तसेच पालिकेतील गटनेत्यांबरोबरच नगरसेवकांचीही बैठक होणार आहे.
अधिकारी-नगरसेवकांत ‘मनसे’ चर्चा

राजसाहेब उद्या कोणत्या विषयावर चर्चा करणार, आमचा विषय तर नाही ना, बघा बॉस, तुम्ही सांभाळून घ्या अशा चर्चा पालिकेत सुरू होत्या. मनसेचे नगरसेवक व अधिकार्‍यांमधील संवादाबाबत पालिकेत चर्चा सुरू होती. अनेक अधिकारी नेहमीप्रमाणे ‘शहर विकासा’चा हवाला देत कोणते मुद्दे साहेबांवरील चर्चेसाठी ‘फायदेशीर’ ठरतील याच्या ‘टिप्सही’ नगरसेवकांना देत असल्याचे सांगितले जात होते. काही नगरसेवकांनी त्यास दुजोराही दिला.