आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यराणी एक्स्प्रेस भुसावळपर्यंत नेण्याचा घातला जातोय घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकच्या प्रवासी संघटना, प्रवासी व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेली मनमाड-कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस भुसावळपर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणी भुसावळपर्यंत नेण्याचा डाव हाणून पाडण्याचा इशारा नाशिकच्या प्रवाशांनी दिला आहे.

नाशिककरांनी मिळवायचे आणि इतरांनी घेऊन जायचे, हे सहन केले जाणार नाही. मनमाड व भुसावळकरांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन गाडी सुरू करावी. त्यांच्या सोयीसाठी नाशिकककरांची गैरसोय होता कामा नये, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पातळीवर कुठलेही आदेश नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यराणीला नाशिकरांचा प्रतिसाद
पंचवटी एक्स्प्रेसला असलेल्या गर्दीमुळे नाशिकच्या नोकरदार, व्यावसायिक राज्यराणीने प्रवासाला प्रतिसाद देतात. त्यात राज्यराणी पंचवटीपूर्वी धावते व वेळेत म्हणजे सकाळी 9.30 वाजता ठाण्याला पोहचत असल्याने राज्यराणीला नाशिकचे प्रवासी मोठय़ा संख्येने असतात. राज्यराणी मनमाडऐवजी भुसावळ येथून सुटल्यास तेथील व मनमाडच्या प्रवाशांमुळे नाशिककरांना बसण्यासाठी जागा राहणार नाही. पुन्हा नाशिककरांची गैरसोय होणार असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

असे होणार नाही
राज्यराणी भुसावळपर्यंत नेण्याची केवळ चर्चा आहे. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोधामुळे रेल्वे प्रशासनाने राज्यराणी मनमाडवरूनच सुटण्याचे आश्वासन दिले आहे. मनोहर पाटील, अध्यक्ष, नाशिक प्रवासी संघटना

नाशिकच्या प्रवाशांचे काय?
‘दुरोंतो’मुळे पंचवटीला दिवसाआड उशीर होत असल्याने नोकरदार ‘राज्यराणी’ने प्रवास करतात. भुसावळवरून सुटल्यास राज्यराणीला उशीर झाल्यास नाशिकच्या प्रवाशांनी काय करायचे? शिवाय राज्यराणीच्या गर्दीत नाशिककरांची रेल्वे काय व्यवस्था करणार आहे. - राजेश फोकणे, प्रवासी

नाशिककरांवर अन्यायच..
नाशिककरांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकसाठीच्या गाड्या कालांतराने विस्तारित झाल्या. नाशिककरांच्या कष्टाचे फळ इतरांना मिळाले. तपोवन, हुतात्मा, पंचवटी, गोदावरी, नाशिक-पुणे एक्स्प्रेस गाड्यांचा विस्तार झाल्याने नाशिकच्या प्रवाशांमध्ये अन्यायाची भावना आहे.