आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajnath Singh News In Marathi, BJP, Raj Thackeray, MNS, Narendra Modi, Divya Marathi

राजनाथांचा इशारा आणि मनसेचे पाऊल पडले मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी पुण्याच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांना पाठिंबाच द्यायचा असेल तर महायुतीत सहभागी व्हा, अथवा पक्षच भाजपमध्ये विलीन करा, असा सल्लावजा टोलाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्याने येत्या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या सहा उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता असून, मनसेचे पदाधिकारी एक पाऊल मागे आल्याचे वृत्त असून, निवडणुकीच्या आठ दिवस अगोदरच भूमिका जाहीर करणार असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
मनसेचे उमेदवार निवडून आले तर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, अशी जाहीर भूमिका राज यांनी घेतली आहे. प्रत्येक प्रचारसभेत ते मोदी आणि गुजरातच्या विकासावर कौतुकसुमने उधळत आहेत. मात्र, भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने उभ्या केलेल्या मतदारसंघांतच मनसेने उमेदवार दिल्याने सेनेच्या उमेदवाराला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर आघाडीकडूनही मनसे-भाजपची ‘सेटिंग’ असल्याची टीका होते. या पार्श्वभूमीवर राजनाथसिंहांच्या पुण्यातील वक्तव्यामुळे मनसैनिकांत नाराजी आहे. पुण्याचा अपवाद वगळता भाजप उमेदवाराच्या विरोधात मनसेने कुठेही उमेदवार दिलेला नसल्याने येथे नाराजी असणे स्वाभाविकच आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांपैकी मनसेने केवळ नाशिकमध्येच उमेदवार दिला आहे. गेल्या निवडणुकीत आठपैकी सहा जागा युतीने राखल्या होत्या. उर्वरित मतदारसंघांपैकी शिर्डीची जागा शिवसेना लढत असून, तिथल्या स्थानिक नेत्यांनी जर मनसेकडे मदत मागितली तर तिथेही विचार होऊ शकतो. परंतु, भाजपच्या दिंडोरी, धुळे-मालेगाव, जळगाव, रावेर या मतदारसंघांत मनसेची भूमिका निर्णायक समजली जाते.
मालेगाव महापालिकेत दोन नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य, जळगाव महापालिकेत 12 नगरसेवकांसह भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर नगरपालिकेतही मनसेचे सात ते आठ नगरसेवक असून, भुसावळ, जामनेर, रावेरमध्ये चांगले संघटन उभे केले आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.