आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातमूल्य रद्द न केल्यास कांद्यातून बॉम्ब फुटतील, राजू शेट्टींचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळालायला सुरुवात झाली की सरकारच्या पोटात गोळा उठतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारप्रमाणे भाजप सरकारने कांदा निर्यातमूल्यात वाढ करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. कांदा निर्यात मूल्यात वाढ करून निर्यात थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रतिटनामागे १७५ डाॅलरने वाढ केल्याने आपोआप बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरत अाहेत. शेतकऱ्यांवर असा अन्याय अापण हाेऊ देणार नाही. त्यासाठी अाम्ही सरकारला धडा शिकवणार आहे. येत्या काही दिवसांतच कांदा उत्पादक रस्त्यावर उतरून बॉम्बप्रमाणे कांद्याचा धमाका करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिला.
भूसंपादन कायद्याचे विधेयक, कांदा निर्यातमूल्यात केलेली वाढ आणि परदेशातून कोंबडीचे अवयव आयात करण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी अायाेजित शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ कृषी उत्पादनात वाढ करण्यापेक्षा उत्पादित केलेला शेतीमाल विक्री करण्यासाठी त्याचे ज्ञान अवगत करायला शिकले पाहिजे. ज्या शेतकऱ्याला मार्केटिंगचे तंत्र जमले तर तो उद्योजकापेक्षाही अधिक यशस्वी होईल. परंतु नुकताच केंद्र शासनाने कांद्यासोबत परदेशातून कोंबडीचे अवयव आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोल्ट्री उद्योग पर्यायाने शेतकरी अडचणीत येणार अाहे.
अाम्ही विनंती करूनही पंतप्रधानांनी कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ केली. त्यामुळे अाता शेतकरी रस्त्यावर उतरणार आहे. भूसंपादन विधेयकाच्या विरोधातही आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असे शेट्टी म्हणाले.
कृषिमंत्र्यांना पाठवला ‘स्पीड पाेस्ट’ने कांदा
कांद्याचे निर्यातमूल्य ४२५ डॉलर प्रतिटन केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या जय किसान फार्मर्स फोरमचे विभागीय अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना कांद्याचे पार्सल स्पीड पोस्टाद्वारे शुक्रवारी पाठवले. तीन महिने कांदा चाळीत साठवून ठेवल्याने त्याचे वजन अाधीच घटले आहे. त्यातच भविष्यात कांद्याचे भाव वाढतील या शक्यतेने केंद्राने हा चुकीचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले अाहे.