आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयामुळे नाही, निकालाच्या राजकारण परंपरेमुळे घेतली निवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गेल्या 45 वर्षांपासून राज्य नाट्य स्पर्धेत सातत्याने भाग घेणार्‍या नेताजी भोईरांनी या स्पर्धेतून घेतलेली निवृत्ती वयपरत्वे असल्याची चर्चा नाट्यवतरुळात असली तरी स्वत: दादांनी मात्र वर्षानुवर्षे निकालात होणार्‍या राजकारणामुळेच आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

यंदा दादांनी स्वलिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘जागं व्हा रं जागं व्हा’ या नाटकाच्या शीर्षकातूनच जणू एक संदेश दिला. त्यांच्या नाटकाला तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, अन् दादांना रौप्यपदक; मात्र दादांनी ‘आता या घाणेरड्या वातावरणात नकोच’ अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

एकच नाटक, एकच संस्था पुन्हा पुन्हा सादर करते याला विरोध व्हायलाच हवा. यंदा नियम आला आहे की, जुनी नाटकेही चालतील. पण, तो नियम सोयीस्करपणे वापरला जात आहे. त्यात असेही आहे की, यापूर्वी ते नाटक सादर केलेल्या संस्थेला पुन्हा तेच नाटक सादर करता येणार नाही. आता काही तांत्रिक बदल करून ते नाटक सादर होतं आणि परीक्षकही त्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे हे सगळंच हास्यास्पद; पण चिंताजनक आहे. यामुळे कलाक्षेत्राकडे येणार्‍या आजच्या तरुणांवर अन्याय होत आहे. निकालातच राजकारण झाले तर ही मुलं उद्या स्पर्धेत येतील का? उलट तरुण रंगकर्मींना या ज्येष्ठ आणि र्शेष्ठांनी मार्गदर्शन करायला हवे. गेल्या 45 वर्षांत एकदाही निष्पक्ष निकाल लागलेला नाही. यंदा तर माझे नाटक होण्यापूर्वी पाच दिवस आधीच माझ्या कानावर चर्चा आली होती की, निकाल आधीच लागलेला आहे. माझ्याच मंडळाची माणसं म्हणतात, ‘दादा, मग स्पर्धा कशाला करायची?’ पण तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) मला सांगितले आहे की, नाटक प्रेक्षकांसाठी कर. मी तेच लक्षात ठेवले होते. पण, आता असह्य होते. परीक्षक मॅनेज होण्याच्या तर किती घटना घडल्या आहेत.
-नेताजी भोईर, ज्येष्ठ रंगकर्मी

गेल्या वर्षीचा अनुभव
गेल्या वर्षी अल्फाबेटिकली माझे नाटक सादरीकरणासाठी पहिले होते. पण, माझ्या नाटकातील अभिनेत्रीला दुखापत झाली होती. त्यावेळी मी संयोजकांना विनंती केली की, दोन दिवस माझे नाटक पुढे ढकला. तेव्हा नाटकच करू नका, असे सांगण्यात आले.

फॉर्मच मिळाला नाही..
एका वर्षी असे झाले की, म्हणे माझ्या संस्थेचा फॉर्मच मिळाला नाही. त्यावेळी त्या ऑफिसमधील चौधरी हे क्लर्क संबंधितांना म्हणाले की, नेताजी भोईरांचा फॉर्म आला नाही असे होऊच शकत नाही. पण, तरीही मला खोटे सांगण्यात आले. मेहंदळे म्हणून अधिकारी होते. त्यांना भेटूही देईनात. खूप प्रयत्न करून भेटलो. त्यांनी मला पर्याय दिला, ‘सहभागी झालेल्या कोणत्याही चार संस्थांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ये.’ सगळ्यांशी चांगलेच वागत असल्याने सर्वच संस्थांनी मला तसे पत्र दिले आणि मला सहभाग मिळाला. पण, आपले कुठेही चुकलेलो नाही. मग प्रवेश मिळाला नाही तर स्पर्धाच होऊ द्यायची नाही, अशी माझी ठाम भूमिका होती.

निकाल लांबला दीड महिना
1976 मध्ये ही असेच राजकारण झाले होते. त्यावेळी मी विरोध केल्याने माझे नाव ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकले होते; पण मी लढत राहिलो. त्यावेळी दीड महिना निकाल माझ्यामुळे लांबला होता. अधिकारी पदावर राजाराम हुमणे होते. त्यांनी विनंती केली की, दादा यापुढे असे होणार नाही. स्टे मागे घ्या, आणि मग त्या स्पर्धेचा निकाल लागला होता.

दादा म्हणतात.
> परीक्षक स्थानिक नसावा.
> सादरीकरणाची रक्कम वाढवा.
> स्पर्धेत सेट लावण्यासाठी वेळ वाढवून द्यावी.
> नवीन कलाकारांच्या सहभागासाठी प्रयत्न हवा.
> नव्या कलाकृती सादर कराव्या.
> ज्येष्ठांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करावे.