आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न सुटणारा ‘येका निकालाचा झांगडगुत्ता..’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल आणि वाद हे समीकरण नवे नाही. मात्र हा वाद का, कोणामुळे आणि कशासाठी होतो याची चर्चा नेहमीच धुसर, अस्पष्टच होते, आणि हा झांगडगुत्ता वाढतच जातो. यंदाही परिस्थिती तशीच आहे. पण, या परिस्थितीला उत्तर देत समन्वयक आणि परीक्षकांनी गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा तर नियम 3 बचा फटका
स्पर्धेचा समन्वयक असल्याने निकालावर भाष्य करणे योग्य होणार नाही. पण, तरीही ‘गोदो’बद्दल फार कोणाचा रोष नाही. रोष आहे तो गायधनींच्या ‘रात्र काळी घागर काळी’ नाटकाबद्दल. हे नाटक वेगळ्या नावाने आधी दोन वेळा सादर झाले आहे. आता नियम 3 ब असे सांगतो की, एकच नाटक एकाच संस्थेला पुन्हा सादर करता येणार नाही. पण, या संस्थेने त्याचे नाव बदलून वा त्यात अंतर्गत काही बदल केले असतील आणि त्यांना शासनाने म्हणजेच सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले असेल तर आपण किंवा परीक्षक काय करणार? यासाठी सहभागी संस्थांनी स्पर्धेपूर्वीच पावले उचलायला हवी. शहरात कोणती संस्था काय सादर करणार आहे, याची चर्चा होत असते. मग त्याचवेळी इतर संस्था आक्षेप का घेत नाहीत? समन्वयक हा संघ आणि शासन यांच्यातील दुवा आहे. तो काय करणार?
-राजेश जाधव, समन्वयक, नाशिक केंद्र

..मग त्यावेळीही खाडाखोड?
माझ्यावर एका संस्थेने केलेले आरोप खोटे आहेत. मुळातच समन्वयक स्पर्धेच्या पाच दिवस आधी निवडला जातो. मग मी त्या संस्थेला ‘तुमच्या विरोधात वातावरण आहे’ असे कसे म्हणेन? म्हणजे यापूर्वी त्या-त्या संस्थांना मिळालेल्या पारितोषिकांबद्दल, त्यावेळीही निकालात खाडाखोड करून पारितोषिके मिळाली असेच म्हणावे का? बिनबुडाचे आरोप करण्यात काही अर्थ नाही. काही शंका असतील तर माझ्याशी प्रत्यक्षात संपर्क साधावा.

शासनाला विनंती करणार
निकाल अगदी चांगला लागला आहे. आता ‘रात्र काळी घागर काळी’वरून जो वाद होतो आहे, त्याला दोन बाजू आहेत. या संघाने नियमाप्रमाणे पूर्तता केलेली आहे. त्याला शासन, सेन्सॉर किंवा परीक्षक काहीच करू शकत नाही. नाटकही उत्तम होते. तरीही मी स्वत: शासनाला विनंती करणार आहे की, सर्व परीक्षकांची बैठक घेऊन या जुन्या आणि नवीन नाटकांबद्दल काही तरी तोडगा काढावा. म्हणजे असे वाद होणार नाहीत. खरंतर नवीन संहिता यायलाच हव्यात. नेताजी भोईरांसारेख ज्येष्ठ कलाकार दरवर्षी नवीन नाटक लिहून सादर करतात, तर मग इतरांनी का करू नये? उलट यंदा शासनाने समन्वयक नेमल्याने स्पर्धा उत्तम झाली. सांस्कृतिक खात्याच्या संचालकांना येथे येऊन त्याची दखल घ्यावी लागली. हे कमी आहे का?
-भाग्यश्री काळे, परीक्षक, नाशिक केंद्र