आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांनी फस्त केली 25 लाख रुपयांची मिठाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तर गुरुवारी किमान 25 लाख रुपयांच्या आसपास मिठाई आणि चॉकलेट्सची विक्री झाल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

नाशिककरांनी हा आनंदाचा उत्सव विविध वस्तूंची खरेदी करत साजरा केला. मिठाई, दुचाकी वाहने, कपडे, सोन्याचे अलंकार यातून ही उलाढाल झाल्याने बाजाराला जणू भरते आल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या.

दुधाचे 50 रुपये लिटरवर पोहोचलेले भाव आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने मिठाईचे भावही यंदा प्रचंड वाढले होते. पेढा, काजूकतली, अंगूरमलाई, रसमलाई, गुलाबजाम, बासुंदी यांसारख्या मिठाईला विशेष पसंती दिसून आल्याचे नंदन स्वीट्सचे संचालक मनोज कोतकर यांनी सांगितले. बदलती लाइफस्टाइल आणि परंपरांसह तोंड गोड करण्याचा ट्रेंडही बदलतो आहे. विशेष करून मुले आणि तरुणांत चॉकलेट्सला पसंती मिळाली. बाजारात उपलब्ध विविध चॉकलेट्चे गिफ्ट यंदा ग्राहकांच्या खरेदीचे प्रमुख केंद्र ठरले.

मंदी असतानाही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने शहरातील व्यवसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून बाजारावर कमी पावसाचे आणि मंदीचे सावट दिसून येत होते. मात्र गुरुवारी झालेल्या उलाढालीवर व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला.
लखलखीत दागिन्यांना पसंती - सोन्याच्या लाइटवेट दागिन्यांसह हिरेजडीत अलंकारांना नाशिककरांकडून पसंती दिली गेली. लाडक्या बहिणीला भेट देण्यासाठी गळ्यातील चेन, ब्रेसलेट, कर्णफुले, पेंडंट, रिंग्ज, पायल यांना पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे सराफी व्यावसायिक गिरधर आडगावकर आणि धनंजय दंडे यांनी सांगितले. अगदी हजार रुपयांपासून भेट देण्यासाठी हे अलंकार उपलब्ध असल्याने दिवसभरात सराफी पेढय़ांवर गर्दी दिसून आली. अलंकारांतूनच 30-35 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.
वाहन बाजारातही तेजी - अनेक दुचाकी वाहन दालनांतून अत्यंत कमी डाउनपेमेंट भरून दुचाकी घरी घेऊन जाता येणार होती, याचा फायदाही तरुणांनी घेत बहिणीला भेट देण्यासाठी वाहनांची भेट निवडली. साची होंडा या दालनातून डिओ, अँक्टिव्हा, एव्हिएटर या 100 गाड्यांची, तर मॅजिक टीव्हीएस या दालनातून स्कूटी आणि विगो या 30 गाड्यांची विक्री झाली. महिलावर्गासाठी असलेल्या किमान 200 वाहनांची विविध कंपन्यांची वाहने दिवसभरात विक्री झाल्याने 50 लाख रुपयांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
कापड बाजारही फुलला - रक्षाबंधननिमित्त शहरातील नामांकित साड्यांच्या दालनांकडून आकर्षक डिस्काउंट ऑफर्स जाहीर करण्यात आले होते. ग्राहकांनी याचा चांगलाच फायदा घेतला. काही दालनांत तर उभे राहायलाही जागा नव्हती. दिवसभरात साड्यांच्या दालनांतूनच जवळपास 50 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. सूटिंग, शर्टिंग आणि ड्रेस मटेरिअलला मोठी मागणी होती. लहान मुलांच्या कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी दिसून आली.