आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेवबाबा लवकरच देशभरात उभारणार मॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बहुराष्ट्रीय कंपन्यांना सशक्त पर्याय म्हणून योगगुरू रामदेवबाबा देशभरातील मोठ्या शहरांमध्ये पतंजलीचे मॉल सुरू करणार आहेत. त्याचप्रमाणे पतंजली नूडल्सच्या संशोधनाचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठवड्याभरात हे नूडल्स बाजारात दाखल होणार असल्याची माहिती रामदेवबाबा यांनी रविवारी नाशिकमध्ये दिली. दोन वर्षांत पतंजली देशातील सर्वात मोठी कंपनी असणार असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स्वदेशी कंपन्याही दर्जेदार उत्पादने देत असतात. पतंजलीच्या माध्यमातून अन्नपदार्थांसह कॉस्मेटिक आयुर्वेदिक उत्पादनेदेखील तयार करण्यात येत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत आयुर्वेदालाही तितक्याच ताकदीने मान्यता मिळवून देऊ. हे व्यवसाय किंवा राजकारण म्हणून नव्हे, तर देशाचा कायापालट करण्यासाठी आपण करत असल्याचे पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी सांगितले. काळ्या पैशाबाबत बोलताना सरकार त्यांचे काम योग्य पद्धतीने करत असले तरी त्यांना अजूनही गतिमान होण्याची गरज असल्याचे सांगितले.

वैदिक शिक्षणाचा प्रस्ताव सादर
देशातील सामाजिक, आर्थिक राजकीय बाबींचे अधपतन झाले आहे. याचे मूळ शिक्षण व्यवस्थेत आहे. शिक्षणाला अध्यात्माची जोड असल्यास चांगल्या गोष्टी होतील. त्यामुळे वैदिक शिक्षा बोर्ड स्थापन करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव सादर करण्यात आला असून, केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसंख्या धोरणाची गरज
एकसंघ देशाचा विचार केल्यास हिंदू-मुस्लिम असा भेद ठेवता लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे धोरण ठरविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे देवस्थानाच्या अधिग्रहणास आपला स्पष्ट विरोध असून, देवस्थान सरकार या दोन भिन्न बाबी आहेत. यातील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गाेहत्या बंदीचा कायदा करून फडणवीस सरकारने चांगला निर्णय घेतल्याचे सांगतानाच कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूंमधील चव्हाट्यावर आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर साधूंवरील अविश्वास वाढत चालल्याचे मान्य करून साधूंनी जबाबदारीचे भान ठेवून समाजाला दिशा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक गावात योगवर्ग
आम्ही आंतरराष्ट्रीय योगदिनापुरतेच मर्यादित राहता वर्षभरात प्रत्येक गावात योगवर्ग सुरू करणार आहोत. यासाठी शिबिरांमध्ये वाढ करण्यात आली असून, देश योगमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.