आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनशून्यतेमुळे रामेश्वर कोरडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण - शासनाने सर्वच धरणांचे गेट बंद करून पाणी साठविण्यासाठीच्या आदेशामुळे चणकापूरचे उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यातच चणकापूर धरणातून सोडलेले 28 दशलक्ष घनफूट पाणी रामेश्वर धरणात न पोहोचल्याने तालुका तहानलेलाच राहणार आहे. यात केवळ कालवा परिसर ओला झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी 12 ऑगस्टपासून चणकापूर उजव्या कालव्याने रामेश्वर धरण भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, 17 ऑगस्ट रोजी कार्यकारी संचालकांनी धरणातील पाण्याचा साठा करण्याचे धोरण ठरविण्यात आले असून, तत्काळ कालव्यांना सोडलेले पाणी बंद करण्याचे आदेश उपअभियंत्यांना दिले. चणकापूर व्यवस्थापनाने तत्काळ गेट बंद करत उजव्या कालव्याचे पाणी बंद केले. मात्र, शासनाचे आदेश येईपर्यंत धरणातून 28 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. परंतु, देवळा तालुक्याचे दुर्दैव म्हणजे कोल्हापूर फाट्यावर चार दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले, तर 24 दशलक्ष घनफूट पाणी रामेश्वर धरणात पोहोचू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई ‘जैसे थे’च आहे.
14 गाव, पाच वाड्यांना टँकरने पाणी - मटाणे, वाजगाव, खर्डे, वार्शी, हनुमंतपाडा, कनकापूर, वडाळे, शेरी, मेशी, कांचने, बिलवाड, सुभाषनगर, वाखारी सांगवी, गुंजाळनगर कुंभार्डे, उमराणे अशा 14 गावे व पाच वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमधील किमान 10 दिवसांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळाली असती.
टँकरवर दररोज आठ हजारांचा खर्च - देवळा तहसील कार्यालयामार्फत सुरू असलेल्या 10 टॅँकरवर दररोज आठ हजार रुपये खर्च होत आहे. कालव्याचे आपत्कालीन गेट बंद केले असते तर 10 दिवसांपोटी 80 हजार रुपये वाचले असते.
आठ महिने पाणी पुरले असते - रामेश्वर धरणाची पाणीसाठा क्षमता 72 दशलक्ष घनफूट इतकी असून, हे धरण चणकापूर उजव्या कालव्याने 20 दिवसांत भरले असते. हे धरण भरल्यानंतर पाणी देवळा तालुक्यातील एक लाख 44 हजार लोकसंख्येला किमान आठ महिने पुरले असते.
पाच दिवसांत पोहोचते पाणी - चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी प्रत्येक वेळी पाच दिवसांत पोहोचते. या वेळी आपत्कालीन गेट उघडे राहिल्यामुळे व पाट दुरुस्ती व स्वच्छ नसल्यामुळे पाच दिवसांत पाणी पोहोचले नाही. पाणी 13 ऑगस्टला सोडले आणि 17 ऑगस्टला बंद केले. पाणी वाया गेले नसते तर किमान 4 ते 5 दशलक्ष घनफूट पाणी धरणात पोहोचले असते.
पाणीटंचाई ‘जैसे थे’च - रामेश्वर धरणात पाणी पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस पाणी सुरू असणे आवश्यक होतेच. त्यातच आपत्कालीन गेटद्वारे पाणी वाया गेल्यामुळे एक दिवस पाणी पुढे येण्यास उशीर झाला. देवळा तालुक्यात पाणीटंचाई आहे. ती तशीच राहील. 28 दशलक्ष घनफूट पाणी वाया गेले असून, त्याचा कुणालाही फायदा झाला नाही. एस. जे. बागुल, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, देवळा