नाशिक - मुस्लिम बांधवांचा उपवासाचा पवित्र महिना अर्थात रमजानला रविवारी (दि. 29) चंद्रदर्शन झाल्याने प्रारंभ झाला.
चंद्रदर्शन होताच जुन्या नाशकातील खाद्यपदार्थ व फळांच्या दुकानांसह बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. यंदादेखील सफरचंद, केळी, पपई, आंबे आदी फळांबरोबरच ओल्या खजुराचे विविध प्रकार, तसेच खास ‘सहेरी’साठी लागणारे नान, खारी, टोस्ट, जिरा बटर, सुत्तरफेणी आदींचे विविध प्रकारदेखील उपलब्ध आहेत.
मशिदींमध्ये सोयी-सुविधा
रमजानच्या काळात शहरातील मशिदींमध्ये नमाजपठणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मशिदींमध्ये योग्य त्या सोयी-सुविधा विश्वस्त मंडळाकडून करण्यात आल्या आहेत. काही मशिदींमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
बोहरा बांधवांत उत्साह
शहरातील दाऊदी बोहरा मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वाला गुरुवार (दि. 26)पासून प्रारंभ झाला. बोहरा बांधवांनी रमजानचा पहिला उपवास पूर्ण केला. सकाळपासूनच टाकळी फाटा येथील कुतुबी मशिदीत नमाजपठणासाठी गर्दी केली होती.