आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान पर्वाची जय्यत तयारी; चंद्रदर्शन आज घडण्याची दाट शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुस्लिम बांधवांना रमजान पर्वाचे वेध लागले असून, मंगळवारी (दि. 9) चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रदर्शन झाल्यास त्याची माहिती येथील मुस्लिम बांधवांनी घास बाजार येथील शाही मशिदीमध्ये द्यावी, असे आवाहन नाशिक जिल्हा चाँद कमिटीने केले आहे.

मुस्लिम बांधव रमजानुल मुबारकच्या स्वागतासाठी सज्ज असून, जुन्या नाशकात त्यासाठी तयारी सुरू आहे. यामुळे बाजारात फळांची रेलचेल दिसून येत आहे. मशिदींमध्ये सोमवारपासूनच नमाजासाठी गर्दी होत आहे. र्शद्धा, संयम व मानवतेची शिकवण देणारा महिना अशी रमजानची ओळख आहे. या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मुस्लिम बांधव समाजातील गरिबांना दानधर्म करतात. त्याचप्रमाणे धनिक मुस्लिमांकडून आपल्या संपत्तीच्या अडीच टक्के इतकी रक्कम जकात म्हणून समाजातील गरजू घटकांमध्ये वाटप केली जाते. दरम्यान, या काळात शांतता राखावी यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात सोमवारी शांतता समितीची बैठक झाली.

वेळापत्रकावर भर
रमजानपर्वासाठी सोमवारपासूनच भ्रमणध्वनीवरून रमजानच्या शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली आहे. तसेच, रमजान मंगळवारपासून सुरू होणार असल्याने बहुतांशी मुस्लिम बांधवांनी दिनदर्शिकेनुसार रमजान महिन्याचे वेळापत्रक छापण्यावर भर दिला आहे.

फळांच्या दरात अचानक वाढ
रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर रोजा (उपवास) करून मशिदीत जाऊन पाच वेळा नमाज पठण करतात. दिवसभर काहीही न खाता रोजा पाळून तो सायंकाळी सोडण्यात येतो. रोजा सोडताना खजूर, केळी, सफरचंद या फळांना प्राधान्य असते. त्यामुळे शहरातील दूधबाजार, कोकणीपुरा, देवळालीगाव, गोसावीवाडी आदी भागात या वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. मागणी वाढल्याने खजूर, दूध, फळे यांचे दर अचानक वाढले आहेत. पुढे आणखी दर वाढतील या भीतीने ग्राहकांनी आताच या वस्तूंची खरेदी सुरू केली आहे.

चंद्रदर्शन घडल्यास माहिती द्या
रमजान पर्वासाठी जय्यत तयारी सुरू असून मंगळवारी चंद्रदर्शन घडल्यास त्याची माहिती मुस्लिम बांधवांनी घास बाजार येथील शाही मशीद येथे किंवा 2508682 व 9823457978 या क्रमांकावर संपर्क साधावा.
-हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, सदस्य, नाशिक जिल्हा चाँद कमिटी