आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंड परिसरात सापडलेल्या मुलींचा आधाराश्रमात सांभाळ; मायेच्या उबेने फुलले चेहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रामकुंड परिसरात बेवारस आढळलेल्या दोन चिमुरड्या मुलींना आधाराश्रमात मायेची ऊब मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे. आधाराश्रमातील लहानग्यांबरोबर खेळताना त्यांना मधूनच आपल्या आईची आठवण येई आणि त्या रडू लागत. या मुलींना अजूनही आपल्या आईची प्रतीक्षा आहे. आपली आई येईल आणि तिच्या कुशीत आपल्याला परत विसावता येईल, या आशेने या मुली आईच्या वाटेकडे नजर लावून बसल्या आहेत. यामुळे आधाराश्रमातील महिलांचे अंत:करण गलबलून गेले आहे.

गंगेवर एका महिलेने एक दीड वर्षाची आणि दुसरी अडीच वर्षांची अशा दोन मुलींना एका भिकारी महिलेकडे ठेवून पलायन केले होते. दिवसभर त्या भिकारी महिलांनी या मुलींचा सांभाळ केला. येथील काही व्यावसायिकांनी मुलींना पोलिसांकडे सुपूर्द केले होते. पंचवटी पोलिसांनी दोघी बहिणींना आधाराश्रमात ठेवले असून, महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधाराश्रमातील आया दोघींना आईचे कपडे दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठी मुलगी फक्त शांत राहून आईच्या आठवणीने रडते, तर लहानगी आईच्या दुधासाठी कासावीस झाली आहे. दोघींचा वियोग बघून येथील कर्मचार्‍यांनादेखील गलबलून आले होते. परिचारिका शुभांगी पंचाक्षरी, निशा पाटील यांच्यासह इतर कर्मचारी या मुलींची देखभाल करीत आहेत.