आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईदने दिला एकात्मतेचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अल्लाहताअलाच्या प्रति आभार व्यक्त करणारा अरबी भाषेतील ईदचा खास मंत्र जपत मंगळवारी (दि. 29) सकाळी मुस्लिम बांधवांनी घरातून पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर शहरातील सर्वच मशिदींमध्ये ईद-उल-फित्रचे सामुदायिक नमाजपठण करून पवित्र रमजान महिन्यास निरोप दिला. घास बाजार येथील शाही मशिदीमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास ईद-उल-फित्रचे मुख्य नमाजपठण झाले. त्यानंतर शहर परिसरात पावसाच्या वातावरणातही दिवसभर पारंपरिक पद्धतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. देशात सर्वत्र शांतता नांदावी, सर्व संकटे नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यासाठी खास दुआ पठण झाले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधवांची उपस्थिती यंदाचेही खास आकर्षण ठरली. सिडकोतील फिरदौस कॉलनी मशीद, सातपूर मशीद, वडाळागाव येथील गौसिया मशीद व जुने नाशिक येथील खडकाळी मशीद, अजमेरी मशीद, बडी मशीद, नानावली मशीद, बडी दर्गा मशीद, मिनारा मशीद येथे सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली.
असे झाले नमाजपठण
सकाळी आठच्या सुमारास शहरातील सर्वच मशिदींत मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. नमाजपठणापूर्वी धर्मगुरूंचे प्रवचन झाले. दरम्यान, पावसामुळे ईदगाह येथील नमाज रद्द करण्यात आली. त्यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये गर्दी झाल्याने दोन वेळा नमाजपठण करण्यात आले. खतीब-ए-शहर अलहाज हाफिज हिसामोद्दिन मिया खतीब यांनी शाहीद मशीद येथील नमाजपठणाचे नेतृत्व केले. मौलाना हाफिज जब्बार यांनी सूत्रसंचालन केले.
खतीब-ए-शहर यांनी ईद-उल-फित्रच्या नमाजपठणाबाबत माहिती दिल्यानंतर सव्वादहाला नमाजपठणास सुरुवात झाली. नमाजपठण संपताच खतीब-ए-शहर यांनी ईद-उल-फित्रच्या अरबी भाषेतील खुतबाचे वाचन केले. नंतर दुआ पठणाचा कार्यक्रम झाला. गाझा व पॅलेस्टाइन येथील समाजबांधवांसाठीही दुआ पठण झाले. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ केले.

शिरखुर्म्याने स्वागत
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणा-या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा देण्यात आला. गोडधोड पदार्थांबरोबरच बिर्याणी, पुलावचा आस्वादही अनेकांनी घेतला. लहानग्यांना मोठ्यांकडून ‘ईदी’ देण्यात आली. रमजानचे कठीण उपवास पूर्ण करणा-या बालकांचे खास कौतुक झाले. ईदनिमित्त नातेवाइकांच्या भेटीगाठी, ईदमिलन आदी कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. पाऊस असूनही राजकीय कार्यकर्त्यांतर्फे ठिकठिकाणी फुलांचे वाटप करण्यात येत होते. खडकाळी येथे मनसेतर्फे हाजी अजहर शेख, बब्बू पेंटर, मोहम्मद साहब, अस्लम खान यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

80 वर्षांत प्रथमच पावसामुळे सामुदायिक नमाजपठणात बाधा
माझे वय 75 वर्षे आहे. परंतु, मला जेव्हापासून आठवते त्यानुसार आणि वडीलधा-यांनी सांगितल्यानुसार नाशकात गेल्या 80 वर्षांत यंदा प्रथमच रमजान ईदच्या दिवशी पावसामुळे ईदगाह मैदानावर सामुदायिकनमाजपठण होऊ शकले नाही. वर्षातून एकदा तरी सामुदायिकनमाजपठण करणे आवश्यक असून, रमजान ईदनिमित्तच ते केले जाते. मात्र, यंदा पावसाच्या व्यत्ययामुळे सामुदायिक नमाजपठणाची संधी गेल्याने मशिदींमध्येच नमाजपठण झाले. दाऊद खान पठाण, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक

दुधाचा दर 70 रुपयांवर!
जुने नाशिक । रमजान ईदला शिरखुर्म्याचे विशेष महत्त्व असते. त्यासाठी मंगळवारी (दि. 29) दुधाची मागणी वाढल्याने दूधबाजारात दुधाचा दर तब्बल 70 रुपये लिटरवर पोहोचला होता. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली होती.