नाशिक - झाेपडी जाळण्याची धमकी देत एका ६० वर्षीय वृद्धेवर तिच्याच पतीसमाेर क्रूरपणे बलात्कार केल्याच्या प्रकरणात भद्रकालीतील दाेघा सख्ख्या भावांसह त्यांच्या साथीदारास जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हेतू ठेवून बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयात प्रथमच बलात्कार प्रकरणी १४ वर्षांपेक्षा जास्त सक्तमजुरीची शिक्षा देण्यात अाली अाहे.
या घटनेत सूरज सुनील तसंबड (वय २५), अनिल सुनील तसंबड (वय २३) अाणि याेगेश बळवंत तिवारी (वय ४५, तिघेही रा. महालक्ष्मी चाळ) याना दाेषी ठरवत शिक्षा ठाेठावण्यात अाली. १३ जुलै २०१५ राेजी रात्री नाशिक-पुणे महामार्गावरील पाैर्णिमा बसथांब्याजवळील एका झाेपडपट्टीत राहणाऱ्या दांपत्यातील वृद्धेवर तसंबड भावांसह तिवारीने शारीरिक अत्याचार केले. तिच्या पतीने विराेध करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी त्यासबेदम मारहाण करत झाेपडी जाळण्याची धमकी देत अाळीपाळीने बलात्कार केला. महिलेच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पाेलिसांत तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल हाेता. हा खटला जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्यासमाेर चालून तपासी अधिकारी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके यांनी घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब सबळ पुरावे सादर केले. सरकारी वकील विद्या जाधव यांनी १० साक्षीदार तपासून संशयितांनी हेतू ठेवून क्रूरपणे बलात्कार केल्याचे सांगत त्यांना अधिकाधिक शिक्षेची मागणी केली होती.