आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सुंदोपसुंदीचा फटका खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसल्यानंतरही ही धुसफूस थांबण्याची चिन्हे नाहीत. पक्षात सांगायचे एक आणि करायचे एक, असे निर्णयतंत्र वापरले जाऊ लागल्यामुळे विधानसभेच्या तोंडावर गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यापूर्वी ज्येष्ठांचा एक नाराज गट सतत कुरापती करत असल्याचे दिसत होते, आता तर युवा गटाने दंड थोपटले आहेत. निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे सोडून मीच प्रामाणिक व समोरचा गद्दार, अशी चिखलफेक करण्याची सुरू झालेली स्पर्धा राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

शहराध्यक्षपदी टिळे यांच्या निवडीनंतर शुक्रवारी घडलेल्या नाट्यामुळे त्याची प्रचिती कार्यकर्त्यांनाही आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी भुजबळांनी प्रयत्न सुरू केल्यानंतर जातीय समीकरणांऐवजी पक्षात नवीन व जुना असा वाद उभा ठाकला आहे. तसा हा वाद नव्याने पक्षात दाखल झाल्यानंतर शरद कोशिरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा आल्यानंतरही झाला होता. मात्र, तेव्हा भुजबळांची पक्षावर चांगलीच पकड होती. त्यांचा शब्द अंतिम होता. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्याने म्हणा की, छोट्या बाबींकडे लक्ष दिल्यास त्याची उलट प्रतिक्रिया येण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे म्हणा यंदा शहराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेपासून भुजबळ हे लांब राहिले. त्यांनी स्थानिक नेत्यांच्या समितीकडे याबाबतचा निर्णय दिला. याच समितीच्या सदस्यांनी भुजबळ व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यावर रविवारी चर्चा करून अंतिम निर्णय होईल, असे सांगितले. मात्र, रविवार उजेडण्यास दोन दिवस बाकी असताना अचानक शुक्रवारी टिळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी पसरली. त्यातून नवीन शहराध्यक्षाचे स्वागत करण्याचे सोडून वा त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची आलेली संधी दवडून नाराजांनी बहिष्काराचे अस्र उगारले. पक्षाचे विभागीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षच नाही तर नगरसेवकांनीही याकडे पाठ फिरवली. शहराध्यक्षांच्या स्वागत सोहळ्यासाठी अक्षरश: दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांना बोलावण्याची धडपडही लपून राहिली नाही. तसे पाहिले तर नवीन व जुना असा वाद टिळे यांनाही नवीन नाही. शिवसेनेत असताना नवख्यांच्या हातात दिलेली सत्ता हाच त्यांच्या पक्षत्यागामागचे प्रमुख कारण होते. आज राष्ट्रवादीत उलटी स्थिती असून, ते नवीन असल्यामुळे त्यांच्याविरोधात जुन्यांचा संघर्ष सुरू झाला आहे. टिळे हे नवीन तर सोडा; मात्र क्रियाशील सदस्यही नसल्याचा दावा स्पर्धकांकडून केला जात आहे.
टिळे यांची नियुक्ती जरी पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेमुळे झाली असली तरी, प्रतिस्पर्धी गटाचा विजय असेच चित्र आता नाराजांकडून रंगवले जात आहे. त्यामुळे आगामी काळात नाराजांची दरी कमी करून त्यांना विधानसभेच्या तोंडावर एकत्र करण्याचे मोठे आव्हान टिळेच नाही तर भुजबळ यांच्यासमोरही असेल. यात नाही पडायचे म्हटले तरी भुजबळ यांनाही हस्तक्षेप करावाच लागेल. अन्यथा राष्ट्रवादीतील गटबाजी विकोपाला जाऊन विधानसभेतही त्याचा मोठा फटका बसल्याशिवाय राहाणार नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.