आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टिळेंची नियुक्ती; कार्यकर्त्यांची नाराजी; निवड झाल्यानंतर स्वागत सोहळ्यात गटबाजी उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर शरद कोशिरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अर्जुन टिळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, टिळे यांच्या निवडीनंतर सायंकाळी राष्ट्रवादी भवनात झालेल्या स्वागत सोहळ्याकडे काही अपवाद वगळता नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी पहिल्याच दिवशी नाशिकला नवीन शहराध्यक्षाची भेट दिली. लोकसभा निवडणुकीनंतर कोशिरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू होती. पक्षातील विधानसभा अध्यक्ष व विभागीय प्रमुखांनी शहराध्यक्षपदावर दावा केला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्येही ज्येष्ठ झालेल्या पदाधिकार्‍यांचा या पदावर दावा होता. मात्र, पुढे उमेदवार निवडीवरून राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याचे चित्र होते. एका गटाला भुजबळ यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांचा पाठिंबा असल्याचे लपून राहिले नाही. ही धुसफूस वाढत असताना पालकमंत्री भुजबळ यांनी केलेल्या चाचपणीत नाना महाले, छबू नागरे, अर्जुन टिळे, देवांग जानी अशी इच्छुकांची नावे पुढे आली. दरम्यान, शहराध्यक्ष ठरवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ज्येष्ठ नेत्यांची समितीही नेमण्यात आली. या समितीने नेमके कोणाचे नाव सुचवले, हे पुढे येण्यापूर्वीच तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर टिळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. टिळे यांचे सायंकाळी 5 वाजता शहरात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

नगरसेवकांनी फिरवली पाठ
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी टिळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या स्वागत सोहळ्यास नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, नगरसेवकच काय, पण शहर पदाधिकारीही या सोहळ्यास अनुपस्थित होते. नाना महाले, शोभा मगर यांचा अपवाद वगळता जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, दीपक वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खुर्चीला महत्त्व द्या
टिळे यांनी छोटेखानी भाषणात राष्ट्रवादीतील धुसफुसीचा समाचार घेताना म्हटले की, पक्ष ठरवेल तो निर्णय महत्त्वाचा आहे. व्यक्तीला महत्त्व नसून, खुर्चीला महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येकाने मीऐवजी आम्ही अशी भावना ठेवून काम केले तर पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता येईल.
राष्ट्रवादीतही सेना पॅटर्नच्या हालचाली
शिवसेनेतून बाहेर पडताना विद्यमान पदाधिकार्‍यांविरोधात सुनील बागुल, अर्जुन टिळे व अन्य पदाधिकार्‍यांनी प्रतिसेनेद्वारे काम करण्याचा प्रयत्न केला होता. तोच पॅटर्न राबवून टिळे यांना शह देण्याचा प्रयत्न आता विधानसभा व विभागीय अध्यक्षांकडून होण्याची शक्यता आहे. टिळेंच्या निवडीनंतर गुप्त बैठकीत राष्ट्रवादी ‘ब’ गट स्थापण्याबाबत चाचपणी झाली. दरम्यान, टिळेंनी नवी कार्यकारिणी करण्याबाबत भाष्य केल्याने नाराजी व्यक्त झाली. राष्ट्रवादीच्या विभागीय व विधानसभा अध्यक्षांची निवड मतदानाने झाल्याने टिळेंना कार्यकारिणी बरखास्तीचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न करत त्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचाही निर्णय झाल्याचे समजते.