आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशील रसिक’ पाडून तेथे खेळाचे मैदान करण्याचा अहवाल गुडेवारांनी पाठवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - खुल्या जागेवरील सुशील रसिक सभागृहाचे सर्व बांधकाम पाडून महापालिकेने जागा ताब्यात घ्यावी आणि तेथे खेळाचे मैदान करावे, असा गोपनीय अहवाल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडण्यापूर्वी शासनाकडे पाठवल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे.

ले आऊटमधील खुल्या जागेवर सर्व प्लॉटधारकांचा अधिकार असतो. त्यांची परवानगी न घेताच मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. विष्णुपंत कोठे यांच्यासह इतर तिघांनी बेकायदा परवानगी घेऊन जास्त बांधकाम केले. तसेच मंजूर लेआऊट(आराखडा)मधील उत्तरेकडील रस्ता खुल्या जागेमध्ये समाविष्ट केल्याचे गुडेवार यांनी 25 जून रोजी शासनाकडे पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. शासनाचे अवर सचिव सुनील मरळे यांच्याकडे हा अहवाल पाठवला आहे.

भगवान कोठे, विष्णुपंत कोठे, सरस्वती व दत्तात्रय कोठे यांच्या मालकीच्या जागेत एक डिसेंबर 1993 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली. 29 जुलै 1994 रोजी तळघर व तळमजल्याच्या सुधारित बांधकामाला परवानगी दिली. त्यानंतर वापर परवाना दिला. तेथे सुशील रसिक सभागृह आहे. याबाबत विजयकुमार महागावकर यांनी केलेल्या तक्रारीवरून 26 डिसेंबर 2013 रोजी सायंकाळी चार वाजता चौकशी केली.

अहवालाचा सारांश
विष्णुपंत कोठेंसह तिघांनी महापालिकेची दिशाभूल करून बांधकाम व वापर परवाना घेतल्याचे दिसून येते. सदर ठिकाणी केलेले बांधकाम अवैध ठरत आहे. याबाबत कोठे यांना नोटीस देऊन वारंवार खुलासा मागितला. त्यांचा खुलासा मनपाकडे आला नाही, असा अहवाल पालिका आयुक्तांकडून नगरविकास खात्याकडे गेला आहे.
आमच्याकडे परवाना
- हे बांधकाम 20 वर्षांपूर्वीचे आहे. आजवर एकाही आयुक्तांनी कारवाई केली नाही. आम्ही नियमानुसार खरेदी व बांधकाम केले. बांधकाम व वापर परवाना बेकायदा असतील तर ते देणा-यांवर कारवाई करा. आम्ही महापालिकेकडे काही कागदपत्रांची मागणी केली. महापालिकेने कागदपत्रे दिली नाहीत. आम्ही नियमानुसार लढत आहोत.’’ महेश कोठे, मनपा सभागृह नेते

निर्णय शासनपातळीवर
- शासनाने अहवाल मागितला अंसून, त्यानुसार नगरविकास खात्याकडे अहवाल दिला आहे. पुढील निर्णय शासन पातळीवर आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, मनपाचे तत्कालीन आयुक्त