आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त धान्य घाेटाळा प्रकरण: घोरपडे बंधूंच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास ‘ईडी’कडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील बहुचर्चित स्वस्त धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी संपत घोरपडे आणि त्याच्या बंधूंच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. भुजबळ यांच्यानंतर नाशिकमधील या दुसऱ्या प्रकरणाचा तपास ‘ईडी’ करणार आहे.
स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकून मुख्य आरोपी संपत नामदेव घोरपडे, अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे यांच्यासह या घोटाळ्याचा मास्टरमाइंड फरार जितूभाई ठक्कर यांच्यासह १० ते १२ संशयितांनी हा कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. नऊ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, घोरपडे बंधू फरार होते. शासनाने घोरपडे बंधूंची दिंडोरी, निफाड, घोटी आणि शहरातील एक पेट्रोलपंप अशी सुमारे दीडशे ते दोनशे कोटींची मालमत्ता जप्त केली होती. घोरपडे बंधूंच्या आर्थिक नाड्या आवळल्यानंतर ते स्वत: न्यायालयास शरण आले.
या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी अाढळून आल्याने संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली. तेव्हापासून संशयित कारागृहात आहेत. या घोटाळ्याचे सुमारे ७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या घोटाळ्याच्या तपासाबाबत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपत घोरपडे आणि फरार जितूभाई ठक्कर यांनी कामगारांच्या नावे बेनामी कंपन्या स्थापन केल्याचे तपासात उघडकीस आले. घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मास्टरमाइंड ठक्कर फरार आहे. घोरपडे बंधू सध्या कारागृहात असून, तपासकामी ‘ईडी’ त्यांचा ताबा घेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...