नाशिक - शहरात श्वान पिसाळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. महापालिकेकडून मोकाट श्वानांचा बंदोबस्त होत नसल्याने शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. पिसाळलेल्या श्वानांची संख्याही वाढत चालली आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयातील श्वान दंश झालेल्या ६५ जणांना लस देण्यात आली आहे
शहरात मोकाट श्वानांची वाढती संख्या नागरिकांना घातक ठरत आहे. मोकाट श्वान पिसाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या श्वानांच्या दंशावर वेळीच उपचार आणि श्वान दंश प्रतिबंधक लस घेतली नाही, तर मनुष्य पिसाळण्याची शक्यता अधिक असते. प्राणिमित्रांकडून श्वान मारल्यास संबंधितांना वेठीस धरले जाते. मात्र, श्वान चावल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी श्वानप्रेमी जातात का, असा संतप्त सवाल पीडित नागरिक करीत आहे. महापालिकेने संबंधित यंत्रणांवरही श्वानप्रेमी संघटनांचा दबाव असल्याने श्वानांबाबत कारवाई करण्यावर दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. मोकाट श्वान पकडलेही जात नाहीत, तसेच त्यांची नसबंदी केली जात नसल्याने श्वानांची संख्या वाढतच चालली आहे.
रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे
*रेबिजप्रतिबंधक लस पाळीव श्वानाला द्यावी. दंशानंतर रेबिजचा विषाणू सुप्तावस्थेमध्ये मेंदूत घर करतो. २५ वर्षांनी हा आजार पुन्हा बळावू शकतो. -डॉ. मनोहर पगारे, पशुवैद्यकीय अधिकारी
सिव्हिलमध्ये लस उपलब्ध
श्वानदंशाचे वाढते प्रमाण लक्षात घेता. रुग्णालयात लस उपलब्ध आहे. एक महिन्यात सुमारे ६५ लस नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या रेकॉर्डवर आहे.