आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजारोंना फायदा, एलबीटी वसुलीच्या ‘अभय याेजने’स सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू असलेल्या राज्यातील २५ महापालिकांच्या क्षेत्रातील नोंदणीकृत, तसेच बिगर नोंदणीकृत व्यावसायिकांसाठी शासनाने यापूर्वी जाहीर केलेली ‘अभय योजना’ बुधवारपासून (दि. ३) लागू करण्यात आली. याबाबतचा अध्यादेश शासनाने काढला असून, संबंधित महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर लागू झालेल्या दिवसापासून ३१ मार्च २०१५ पर्यंतच्या संपूर्ण कालावधीसाठी ही योजना लागू असेल.
या योजनेअंतर्गत, व्यापारी अथवा व्यक्तीने संबंधित महानगरपालिकेला देय असलेल्या स्थानिक संस्था कराच्या थकबाकीपैकी मूळ कराची संपूर्ण रक्कम ३१ जुलै २०१५ पर्यंत भरल्यास संपूर्ण व्याज दंड माफ केला जाणार आहे. त्याचा फायदा नाशिकमधील हजारो व्यापाऱ्यांना होणार आहे.
संबंधित व्यापारी, उद्योग घटकाने थकीत मूळ रकमेचा अंशत: भरणा केल्यास, भरणा केलेल्या कराच्या प्रमाणात व्याज दंडाची माफी देण्यात येणार असून, भरलेला कर, व्याज दंडासह वसूल करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. व्यापाऱ्याने विवरण दाखल केलेले नसेल आणि अभय योजनेच्या काळात विवरण दाखल करून देय असलेल्या संपूर्ण कराचा भरणा केला तर व्याज दंडाची आकारणी करण्यात येणार नाही. विवरण अगाेदरच दाखल केलेले असेल आणि पूर्वीच सुधारित विवरण दाखल करून अतिरिक्त करदायित्व मान्य केले असेल, तसेच संपूर्ण कराचा भरणा केला असेल तर व्याज दंडाची आकारणी केली जाणार नाही.
अभय योजना सुरू होण्यापूर्वी विवरणानुसार संपूर्ण कराचा भरणा केला असल्यास अशा उशिरा भरलेल्या कराच्या प्रदानावरील व्याज आणि दंडाची आकारणी करण्यात येणार नाही. योजनेचा परिणाम म्हणून कोणताही परतावा दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत सर्व कर निर्धारणा ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतर करदात्यावर व्याज दंडाचे दायित्व राहणार नाही.