आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडीरेकनर तफावतीचा तक्ता मुद्रांक आयुक्तांना पाठविणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -बाजारमूल्यापेक्षा अनाकलनीय आणि अवास्तवरीत्या वाढविलेल्या रेडीरेकनर दरांतील तफावतीचा तक्ता आता मुद्रांक व नोंदणी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांच्याकडे पाठविला जाणार आहे. याबाबत क्रेडाईच्या पदाधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेअंती चोक्कलिंगम यांनी दर तफावतीचा फेरअभ्यास केला जाईल, असे सूचित केल्याने अवास्तव दरवाढीचा पुनर्विचार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चोक्कलिंगम यांनी वास्तव स्थितीचा विचार करून दरवाढ कमी करण्याचा निर्णय घेतला तर शहरातील घर घेऊ इच्छिणार्‍या सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा मिळू शकणार आहे.
राज्य शासनाने 1 जानेवारीपासून रेडीरेकनर 40 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. यामुळे घर घेऊ इच्छिणार्‍यांना करापोटी 40 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय, उत्पन्न कराला रेडीरेकनर जोडण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांना न झालेल्या व्यवहाराच्या रकमेवर प्रत्येकी 33 टक्के उत्पन्नकर भरावा लागणार आहे. पोटेन्शियल प्लॉटवर 40 टक्के, तर क्लब हाउस, जिम्नॅशियम अशा सुविधा दिल्यास अतिरिक्त 15 टक्के कर ग्राहकांना भरावा लागणार आहे. या जाचक तरतुदीमुळे रिअल इस्टेटमधील व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आर्थिक संस्था अडचणीत येतील
गृह खरेदीकरीता बँका 80-90 टक्क्यांपर्यंत कर्ज देत असतात. यामुळे काही ठिकाणी कर्ज दिले गेले तर ते वास्तव दरापेक्षा जास्त असेल. यामुळे भविष्यात वित्तीय संस्था अडचणीत येणार आहेत. अरुण कुकडे, बँकिंग तज्ज्ञ
व्यावसायिकांनी थांबविले व्यवहार
सर्वच रेडीरेकनर चुकीचा असल्याने तो सुधारला जावा, अन्याय्य तरतुदी काढण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. कराबाबत संभ्रमावस्था असल्याने आमच्या सदस्यांकडून पाच दिवसांत खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले नाहीत. शासनाच्या महसुलावरही त्यामुळे विपरीत परिणाम झाला आहे. किरण चव्हाण, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक