आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष; ‘संदर्भ’मधील ९२ पदे रिक्तच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मोठ्या आजारांवरील उपचारांसाठी नाशिक विभागातही शासनाचे रुग्णालय असावे, यासाठी आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या पाठपुराव्यानंतर नाशिकमध्ये संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या रुग्णालयाचेच आरोग्य अवघ्या आठ वर्षांतच ढासळायला लागले असून, रुग्णालय प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयातील यंत्रणेच्या समस्यांसोबतच मंजूर आकृतिबंधातील ३६७ पदांपैकी ९२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या हेतूने शासनाने जुलै २००८ मध्ये नाशिकमध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही नागरिक उपचारासाठी येतात. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ या रुग्णालयाद्वारे रुग्णांना मिळाला आहे. या रुग्णालयात केवळ १०० बेड असल्यामुळे ते रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरे पडतात. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालय सुरू झाल्यापासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांचाही भार याच रुग्णालयावर पडत असल्याने अनेकदा खाटांची कमतरता भासते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागताे. सद्यस्थितीत संदर्भ सेवा रुग्णालयातील खाटा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या समस्येबराेबरच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामधील मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, मूत्रपिंड विकार शस्त्रक्रियातज्ज्ञ, हृदयविकार शस्त्रक्रियातज्ज्ञ, हृदयविकार बधिरीकरणतज्ज्ञ, हृदयविकार उपचार भिषज अशी विशेषज्ज्ञांची २२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयात रिक्त असलेल्या पदांच्या भरतीसाठी रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार प्रस्ताव पाठवूनही त्याकडे डोळेझाक केली जाते आहे. रुग्णालयातील काही उपलब्ध सेवाच रुग्णशय्येवर असताना, त्यात रिक्त पदांचीही मोठी भर पडलेली आहे. त्यामुळेच याचा सर्व ताप हा रुग्णांना सहन करावा लागतो.

पाठपुराव्या अभावी प्रस्ताव पडून
संदर्भ रुग्णालयाच्या वाढीव दोन मजल्यांचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. दोन मजले वाढविल्यास रुग्णांसाठी २०० बेड, सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी पेडियाट्रिक हे तीन विभाग होऊ शकतील, असे पत्र खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र, पाठपुरा‌व्याअभावी हे कामे रखडल्याचे चित्र आहे.

रिक्त पदांसाठी प्रस्ताव दिला आहे
^विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात रिक्त पदे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे येणारी अडचण बघून रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही यापूर्वीच प्रस्ताव सादर केलेला आहे. - डॉ. एस. पी. पाटील, आरोग्यउपसंचालक