आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Regional Office Of Caste Certificate Verification

विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जातपडताळणीची, 15 हजार विद्यार्थी सवलतीपासून राहणार वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीकडे यावर्षी विज्ञानशाखेच्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. मात्र समितीला गत दोन वर्षांपासून अजूनही कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाले नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रकरणे शिल्लक राहिल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहण्याची नामुष्की येणार आहे.

नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीकडे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे पडताळणीसाठी येत असतात. मात्र, समितीकडे केवळ सदस्य सचिव हेच कायमस्वरूपी आहे. अध्यक्ष आणि सदस्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे अकोला समितीचे अध्यक्ष एच. पी. तुम्मोड यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. जाधव यांच्याकडे सदस्याचा तात्पुरता पदभार आहे. त्यामुळे प्रकरणांची तपासणी झाली, तरी अध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे प्रकरणे शिल्लक राहतात. त्यामुळे नाशिक विभागीय समितीला प्रथम कायमस्वरूपी अध्यक्ष मिळाल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता राहील. माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांनी त्वरित अध्यक्ष दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, नाशिक समितीला अजुनही अध्यक्ष मिळाले नाही. त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना भाजप सरकारकडून अध्यक्ष मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षीसाठी नाशिक जिल्ह्यातील सात हजार नगर जिल्ह्यातील नऊ हजार विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरपर्यंत उच्च शिक्षणासाठी अर्ज केले आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये प्रवेशासाठी हे प्रमाणपत्र लागणार असल्याने समिती मागील प्रकरणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शासनाने निवडणुकीतील केवळ विजयी उमेदवारांची प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिल्याने समितीचा भार कमी झाला आहे. नाशिक समितीमध्ये ७०० ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने समितीला शैक्षणिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी विलंब व्हायचा, आता तो विलंब होणार नाही. त्यामुळे दलाल आणि भ्रष्टाचारालाही अाळा बसण्यास मदत होणार आहे.