आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नोंदणी कागदावरच, बांधकाम मजुरांचा प्रश्न पडला अडगळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यात तीन लाखांहून अधिक बांधकाम कामगार आहेत. मात्र, ही आकडेवारी नाेंदणीत आढळून येत नाही. जे कामगार सतत वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात त्यांची नोंदणी हाेत नसून, ती अावश्यक आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांची धडक नोंदणी मोहीम त्वरित घेण्याबाबत नोव्हेंबरला अध्यादेश काढून ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे अादेश देण्यात अाले हाेते. राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मुख्याधिकाऱ्यांना नोंदणी करून त्याबाबत आदेशित करण्यात अाले हाेते. तसेच, ही नाेंदणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात अाले हाेते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणीच झाली नसल्याचे वास्तव निदर्शनास अाले अाहे.
शासनाने राज्यातील नोंदणीकृत कामगारांसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामाच्या हाताखाली काम करणारे मजूर यांनादेखील नगरपालिकेच्या पातळीवर मुख्याधिकाऱ्याने प्राधिकृत करून कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय केला. त्यासाठी कामगाराच्या नोंदणीचे काम हे बांधकाम कामगार कल्याण मंडळ करत असते. परंतु, बहुतांश ठिकाणी स्थानिक नाका कामगार असतात ते कोणत्याही प्रकारच्या कायम अास्थापनेवर कार्यरत नसतात किंवा ते वेगवेगळ्या मालकांकडे काम करत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकृत कामगारांची संख्या कमी येत असल्याने नगरपरिषद, महानगरपालिका पातळीवर अशाप्रकारे कामगारांच्या नोंदणी करून त्यांच्यासाठी १६ कलमी कार्यक्रम राबविण्यात येण्याबाबत अध्यादेश काढण्यात अालेला आहे. परंतु, नोव्हेंबरपासून अद्यापपर्यंत जिल्ह्यातील एकाही नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अधिकाऱ्याने याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचललेले नसल्याचे ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले अाहे.

नगरपालिकांमध्ये ही नाही कार्यवाही
नाशिक पालिके प्रमाणेच जिल्ह्यातील नगरपरिषदांतही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती अाहे. राज्य शासनाने अशा स्वरूपाच्या माेजणीचा अध्यादेश काढला असला, तरी अद्यापपर्यंत त्यावर कार्यवाही करणे शक्य झालेले नसल्याचे येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले. येवला नगरपालिका ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असल्याने तेथील प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेण्यात अाली अाहे. मात्र, अन्य बहुतांश नगरपालिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती अाहे.

कामगार कल्याणचा १६ कलमी कार्यक्रम
शासनाच्या कामगार कल्याण अंतर्गत १६ कलमी विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकतो. त्यामध्ये कामगारास त्याच्या पत्नीच्या पहिल्या बाळंतपणास (नैसर्गिक) १० हजार रुपये शस्त्रक्रिया झाल्यास १५ हजार तत्काळ मदत दिली जाणार अाहे. शैक्षणिक अंतर्गत नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांस पहिली ते सातवीसाठी १२००, तर आठवी ते दहावीसाठी २४०० रुपये देण्याचे अादेश अाहेत. दहावी बारावी परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या कामगाराच्या पाल्यास पाच हजारांची शिष्यवृत्ती, ११ वी १२ वी प्रवेशासाठी हजार रुपये तत्काळ देण्यात येतील. ज्या नोंदणीकृत कामगारांचा पाल्य पदव्युतर शिक्षणासाठी पात्र आहे, त्यास दरवर्षी १५ हजार रुपये दिले जाणार अाहेत. नोंदणीकृत कामगाराच्या पाल्यास एमएससीआयटी हा कोर्स मोफत करून देण्यात येतो. मात्र, या सगळ्या नियमावलींची माहितीच सामान्य कामगारांपर्यंत पाेहाेचलेली नसून शासकीय स्तरावर उदासीनता दिसते.

कामगाराच्या कुटुंबालाही मिळू शकते मदत
ज्या नोंदणीकृत कामगाराचा पाल्य वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणास पात्र झाल्यास त्याला वार्षिक ५० हजार रुपये दिले जाणार अाहेत. तसेच शासनाच्या विविध पदविकांसाठी पाल्य पात्र झाल्यास १० हजार रुपये दिले जातील. ज्या नोंदणीकृत कामगाराने दोन मुलींवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केली आहे, अशांना २५ हजार रुपये देण्यात येतात. नोंदणीकृत कामगारास कामादरम्यान काही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तर त्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. नोंदणीकृत कामगार मृत पावला तर त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाइकास तत्काळ हजार रुपये मदत देण्यात येते. ज्या नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाला, त्याच्या विधवा पत्नीस दरमहा एक हजार रुपयांप्रमाणे पाच वर्षे पेन्शन देण्यात येते. नोंदणीकृत कामगाराच्या वैद्यकीय सेवेसाठी २५ हजारांची मदत, नोंदणीकृत कामगार विवाहयोग्य असेल तर विवाहासाठी १० हजार रुपये मदत तत्काळ देण्यात येते. जर नोंदणीकृत कामगार आजारी असेल तर त्याची बुडीत मजुरी म्हणून त्यास १०० रुपये प्रतिदिन देण्यात येतात.
एल. व्ही. नेर, सहायकअायुक्त, नाशिक महापालिका

अादेश अन‌् फाइलची फिरवाफिरवी
अादेश उशिरा मिळाले किंवा ते अामच्या विभागाचे कामकाज नाही, म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयास प्रशासनाकडून केला जात अाहे. या कामाला वेळ देण्यात कुठलाच ‘अर्थ’ नसल्यामुळेच कामाबाबत काणाडाेळा केला जात असल्याचे डी. बी. स्टारच्या निदर्शनास अाले अाहे.