आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू-सासऱ्यांनी केला सुनेचा पुनर्विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘छोटीबहू’ या कादंबरीत िकंवा ‘बालिका वधू’ या हिंदी टीव्ही मालिकेत पाहायला मिळालेला ‘सुनेचा विवाह’ आपल्या स्मरणात असेल. मात्र, असाच एक प्रत्यक्ष ‘सुनेचा विवाह सोहळा’ नुकताच गोविंदनगर येथे पार पडला. पतंगे दांपत्याने आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या सुनेचा पुनर्विवाह करून देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
खामगाव (जि. बुलडाणा) येथे राहणारे अरुण पतंगे यांच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे पतंगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलाच्या निधनाचे दु:ख पतंगे कुटुंबीयांना होतेच, मात्र सून पूनम आणि सात वर्षांच्या नातवाच्या भविष्याची काळजीही लागली होती. अशा परिस्थितीत या दु:खातून सावरत सासू-सासऱ्यांनी पूनमचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर पूनम त्यांची ‘कन्या’ बनली, असे पतंगे दांपत्य सांगतात. तिच्यासाठी त्यांनी योग्य वराचा शोध घेतला आणि जितेंद्र भावसार यांच्याशी पुनर्विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मूळचा तळोदा येथील रहिवासी असलेले जितेंद्र यांनी सर्व परिस्थिती मान्य करत पूनम हिच्याशी लग्न करण्याचे तिच्या सात वर्षांच्या मुलाचा स्वीकार करण्याचे मान्य केले.
भावसार कुटुंबीयांनीही त्यास मान्यता दिली. शहरातील गोविंदनगर परिसरात जून रोजी झालेल्या लग्नसाेहळ्यात पतंगे सासू- सासऱ्यांनी सुनेचे कन्यादान करत, तिच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. या अनोख्या विवाह सोहळ्यात हिंगलाज माता मंदिराचे प्रमुख विश्वस्त सुधारक तोरणे यांनी नवदांपत्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याद्वारे पतंगे आणि भावसार कुटुंबीयांनी समाजासमोर एका प्रकारचा अादर्शच निर्माण केला आहे.
भविष्याचा विचार करून घेतला निर्णय
अवघ्यासात वर्षांचा नातू आणि अख्खे आयुष्य समोर असलेल्या सुनेच्या भविष्याचा विचार करून पतंगे दांपत्याने हा योग्य आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर कित्येकदा वारस म्हणून नातवाचा सांभाळ केला जातो, मात्र सुनेकडे ओझे म्हणून पाहिले जाते. या विचारांना फाटा देत पतंगे कुटुंबीयांनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवला आहे.