आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. सा. नाट्यगृहाचा मेकअप, बाहेरील भिंत पाडून जागा केली प्रशस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात कालिदास कलामंदिर आणि प. सा. नाट्यगृह ही दोन्ही महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. कालिदासची इमारत सुंदर दिसत असली तरी आतील दुरवस्था सर्वश्रृत आहेच. तुलनेने प. सा. नाट्यगृह बरे असे म्हटले जाते. आता तर प. सा. नाट्यगृहाचा चांगलाच मेकअप होतो आहे. प्रशस्त जागेमुळे झळाळी आली आहे.

शहरातील विविध संस्थांचे कार्यक्रम, शासनाच्या स्पर्धा यासाठी प. सा. नाट्यगृहाला प्राधान्य दिले जाते. तर, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रस्त्याला लागूनच असल्यानेही अनेकजण याच नाट्यगृहाला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांपासून या नाट्यगृहाचा परिसर जणू दाटीवाटीचा झाला हाेता. त्यामुळे बाेर्ड लावायला जागा नाही, पार्किंगचा प्रश्न आहेच. कॅन्टीनचाही प्रश्न होताच. शिवाय एखादे नाटक असेल तर त्या नाटकाच्या साहित्याची गाडी लावायलाही जागा नसे. आता मात्र हा परिसर एकदम मोकळा करण्यात आला असून, येथे पेव्हर बसविण्यात आले आहेत. याच मोकळ्या भागात सध्या शासनाचा कलारंग लोककला उत्सव हाेताे आणि त्याला रसिक गर्दीही करत आहेत.
नाट्यगृहाचे कंपाऊंड म्हणून लावण्यात आलेली लाेखंडाची खांब आणि त्यावर लावण्यात येणाऱ्या फलकांद्वारे कार्यक्रमांची, नाटकांची प्रसिद्धी होणार आहे. तर आतल्या बाजूने जाहिरातदारांसाठी फलकांची जागा साेडण्यात आली आहे. वाचनालयाच्या बाजूने तसेच नाट्यगृहाच्या मागील भिंतीलाही तशीच फलके उभारण्यात येणार असून, त्यावरील फलके काही संस्थांना देण्यात येणार आहेत. या संस्थांनी त्यावर साहित्य-संस्कृतीविषयी माहिती लिहायची असल्याचे सावानाचे नाट्यागृह सचिव सुरेश गायधनी यांनी सांगितले.

रसिकांच्या सेवेत कॅन्टीनही
या भागात मध्यंतरात रसिकांसाठी चहा-कॉफीची काही व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे आता बाल्कनीकडे जाणाऱ्या जिन्याखालच्या जागेत कॅन्टीन बांधण्यात येणार आहे. मात्र, या कॅन्टीनमध्ये जो कोणी कॅन्टीन चालवणार आहे त्याने सर्व पदार्थ बाहेरून तयार करून आणायचे आहेत. येथे कोणताही पदार्थ तयार करता येणार नाही. तसेच कार्यक्रम नसतानाही हे कॅन्टीन चालू ठेवता येणार आहे.
पार्किंगचा प्रश्न सुटणार
प. सा. नाट्यगृहात कोणताही कार्यक्रम असला की, पार्किंगचा मोठा प्रश्न होता. बाहेर रस्त्यावर वाहने लागत असल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असे. त्यामुळे आता आतील भिंती तोडून तसेच वा. गो. कुलकर्णी कलादालन ताेडून आतील परिसर पूर्णत: मोकळा करण्यात आल्याने वाहने लावण्यास मोठी जागा झाली आहे. तसेच याच जागेवर शहरातील रंगकर्मींनाही बसता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...