आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी क्षमता वाढवण्याची गरज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी काळात रिझर्व्ह बँकेच्या तरतुदींमुळे स्पर्धा तीव्र होणार असून बँकांना स्वत:ची क्षमता वाढवावी लागणार आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची संरचना करून नफाही वाढवावा लागेल, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक आर्थिक सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी केले.

‘निमा बॅँक समिट 2013’च्या उद्घाटनप्रसंगी रारावीकर म्हणाले, ‘अनेक बॅँका एनपीएच्या भीतीने सरकारच्या सुरक्षित ठेव योजनांत पैसा ठेवून व्याज मिळवतात. त्याऐवजी या बॅँकांनी उद्योगांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. रिझर्व्ह बॅँकेने 180 अब्ज रुपये बँक व्यवसायात ओतले असून ते बँकांनी उद्योगांकडे प्रवाहित करण्याची गरज आहे. देशात आजघडीला अडीच कोटी लघुउद्योग असून, सहा कोटी लोक त्यावर अवलंबून आहेत. असे असले तरी केवळ पाच टक्के लघुउद्योगांना बॅँकांकडून कर्जवितरण झालेले आहे. दोन टक्के लघुउद्योग इतर मार्गाने भांडवल उभे करतात. तर तब्बल 93 टक्के उद्योग कर्ज मागत नाहीत.’

परदेशी बॅँकांना देशात कारभार करताना 40 टक्के कर्ज लघुउद्योग आणि प्राथमिक क्षेत्रासाठी द्यावे, असे बंधन घातल्याचे त्यांनी सांगितले. लघुउद्योगांच्या कर्जपुरवठय़ात वर्षभरात 25 टक्के वाढ झालेली असून दरवर्षी 20 टक्के वाढ करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने दिलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बॅँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य महाव्यवस्थापक बालकृष्णा पिपारिया, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, नरेंद्र हिरावत, विश्वस्त समितीचे अध्यक्ष अशोक राजवाडे आदी व्यासपीठावर होते.

तीन दिवसांत कर्जप्रक्रिया

निमा बॅँक समिटच्या निमित्ताने उद्योग आणि बॅँकांना एका व्यासपीठावर आणण्याचा स्तुत्य उपक्रम निमाने केला आहे. जिल्ह्याची अग्रणी बॅँक असलेल्या बॅँक ऑफ महाराष्ट्रकडून तीन दिवसांत कर्जप्रकरणाबाबत निर्णय दिला जाणार असल्याचे बॅँकेचे मुख्य महाव्यवस्थापक बालकृष्णा पिपारिया यांनी यावेळी स्षष्ट केले.

आज होणार समिटचा समारोप

समिटचा समारोप गुरुवारी होणार आहे. एकाच छताखाली जवळपास 15 बॅँकांची दालने येथे असून उद्योजकांसाठी विविध कर्ज योजनांची माहिती येथे उपलब्ध आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालणार्‍या या समिटचा फायदा उद्योजकांनी घेण्याचे आवाहन निमाने केले आहे.