आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेकडील चलनातून रद्द 319 कोटी रिझर्व्ह बँकेकडे, आर्थिक कोंडी लवकरच फुटण्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नोटाबंदीच्या काळात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या तीनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या नोटांपैकी तीनशे एकोणावीस कोटी रुपये मंगळवारी मध्यरात्री भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आले आहेत. विशेष कंटेनर आणि मोठ्या सुरक्षाव्यवस्थेत ही रक्कम बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता लवकरच बँकेला नवे चलन उपलब्ध होईल आणि बँकेची आर्थिक कोंडी फुटेल अशी चिन्हे आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी अचानक चलनात असलेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली. यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जिल्हा बँकेत जवळपास तीनशे बेचाळीस कोटी रुपयांचे चलन जमा झाले. यानंतर केंद्र सरकारने जिल्हा बँका, नागरी बँका यांना चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली. त्याचबरोबर जमा झालेल्या नोटा बदलून देण्यासही असमर्थता दर्शविली. यामुळे मात्र देशभरातील जिल्हा बँका अडचणीत आल्या. यात नाशिक जिल्हा बँकेचाही समावेश होता. जिल्हा बँकांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका दाखल केल्या होत्या. बँकेत यामुळे चलनतुटवडा निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारासाठी पैसा उभा करण्यातही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर बँकांसमोर शेतकऱ्यांबरोबरच शिक्षकांचीही आंदोलने बघायला मिळाली.

दरम्यान, गत महिन्यात तीस दिवसांमध्ये अशा नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करून त्या बदलून देण्याबाबत केंद्र सरकारने घोषणा केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेकडील चलनातून रद्द तीनशे एकोणीस कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत. आता या नोटा टप्प्याटप्प्याने बदलून मिळतात की बँकेत नव्यानेच दाखल झालेले व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बकाल यांनी म्हटल्याप्रमाणे बँकेचा एसएलआर कायम राहावा यासाठी रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केल्या जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टप्प्याटप्प्याने रक्कम मिळण्याची चिन्हे
एकूण तीनशे बेचाळीस कोटींपैकी तीनशे एकोणावीस कोटी रुपयांच्या नोटा मंगळवारी रात्री रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत. टप्प्याटप्प्याने ही रक्कम बँकेला मिळेल अशी चिन्हे आहेत.
- नरेंद्र दराडे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
बातम्या आणखी आहेत...