आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षितपैकी केवळ एकचतुर्थांश मैदाने पालिकेच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दैनंदिन राजकारणाच्या ‘खेळा’तच व्यग्र असलेल्या महापालिकेच्या मुखंडांना विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या 44 मैदानांपैकी एकचतुर्थांश मैदानेच ताब्यात घेता आली आहेत. 1993 च्या विकास आराखड्यापासून आता 20 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही आरक्षित मैदानांपैकी 12 मैदानेच ताब्यात घेणार्‍या महापालिकेला स्वत:च्या मैदानांबाबत किती आस्था आहे, त्याचा प्रत्यय येण्यास ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

आरक्षणानंतर संबंधित जागामालकाला शासनाच्या दरानुसार जागेचा मोबदला देऊन किंवा टीडीआर (स्थानांतरणीय हक्क) देऊन पालिकेने गत 20 वर्षे ती मैदाने ताब्यात घेण्यातच अनास्था दाखवली आहे. जी 12 मैदाने ताब्यात घेतली तीदेखील पडीक जमिनींप्रमाणेच यथास्थित असून, त्यावर कोणत्याही खेळांसाठीच्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.

देखभालीचे नाही नियोजन : जिथे किती मैदाने निश्चित ताब्यात घेतली त्यांची संख्यादेखील ज्ञात नाही, तिथे त्या मैदानांची देखभाल आणि त्यांच्या वापराबाबतचे नियोजन या बाबींचा तर कधी विचारही करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यातील सुस्थितीत किती आणि दुरवस्थेत किती, याची पुसटशी कल्पनादेखील महापालिकेला नाही. महापालिकेची कर्तव्ये म्हणजे रस्ते, पाणी, पथदीप, गटारी, समाजमंदिरे, संरक्षक भिंती यांसारख्या ‘अर्थ’पूर्ण विकासकामांचा प्रचंड व्याप करण्याच्या महत्त्वाच्या कामातच महापालिकेची सर्व यंत्रणा गुंतलेली आहे. त्यामुळे मैदाने, क्रीडांगणे यांसारख्या अत्यंत तुच्छ कामांचा विचारही मनपाच्या स्थापनेपासून शिवलेला नाही.

ही मैदानेच केवळ ताब्यात : 1993च्या विकास आराखड्यात आरक्षित 44 क्रीडांगणांपैकी गंगापूर गाव (सव्र्हे नं. 162), दसक (सव्र्हे नं. 64, 68, 49), पंचवटी (सव्र्हे नं. 159), पंचवटी (सव्र्हे नं. 288), पंचवटी (सव्र्हे नं. 238, 239, 240), पंचवटी (सव्र्हे नं. 201, 232), पंचवटी (सव्र्हे नं. 206, 207, 211), राणेनगर (सव्र्हे नं. 907), गंगापूररोड (सव्र्हे नं. 434), सातपूर (सव्र्हे नं. 71), वडाळा (सव्र्हे नं. 20, 21, 32, 34) आणि आडगाव (सव्र्हे नं. 1079) ही 12 मैदानेच केवळ कागदोपत्री पालिकेच्या ताब्यात आहेत. अन्य 32 मैदानांपैकी तीन मैदाने शाळांनी विकसित केली आहेत, तर उर्वरित 29 मैदानांपैकी 13 मैदानांचा केवळ काही भागच ताब्यात, तर 16 मैदानांचे पूर्ण अधिग्रहणच बाकी आहे.

मैदानांबाबत टोकाची अनास्था
कोणत्याही शहरातील मैदाने ही त्या शहरांचा श्वास असतात. माणसाचा श्वासच कोंडला गेला तर तो मरतो, त्याप्रमाणेच मैदाने हातची जाऊ दिल्यास किंवा योग्यप्रकारे विकसित न केल्यास त्या शहराचे आरोग्यदेखील धोक्यात येऊ शकते, याचे भान सत्ताधार्‍यांनी राखणे गरजेचे आहे. मात्र, भारतात सर्वच स्तरांवर खेळ आणि मैदानांबाबत टोकाची अनास्था दिसून येत असून, ते विदारक वास्तव बदलण्याची गरज आहे. - भीष्मराज बाम, ज्येष्ठ क्रीडामानसतज्ज्ञ