आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासी प्रशिक्षण शिबिराकडे फिरवली नगरसेवकांनी पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एरवी विकास आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणारे नगरसेवक मात्र शासनाकडून त्यांच्यासाठी आयोजित केल्या जाणा-या विविध उपक्रमांपासून चार हात दूरच राहणे पसंत करतात. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट या संस्थेतर्फे आयोजित निवासी प्रशिक्षण शिबिरात. सोमवारी सुरू झालेल्या या शिबिराला पहिल्या दिवशी उणेपुरे तीनच नगरसेवकांनी हजेरी लावली.

स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे विकासाच्या रथाचे दोन चाके असतात. या दोन्हींमध्ये समन्वय असेल, तर मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणारे जिल्हा परिषद आणि महापालिकेचा रहाटगाडा सुरळीतपणे चालतो. मात्र, सध्या असे चित्र अभावानेच पहावयास मिळते. त्यातही लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाच्या विरोधात बोलणेच पसंत केले जाते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा समन्वय रहावा, यासाठी शासनाकडून दरवेळी विविध उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांसाठी गिरणारे येथील आलिशान अशा फार्म हाउसमध्ये पार पडला. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत होणा-या या प्रशिक्षण शिबिरासाठी 60-60 असे नगरसेवकांचे प्रमाण ठेवण्यात आले होते. त्यासाठी शिबिरापूर्वी प्रत्येक नगरसेवकास पत्राद्वारे कळविण्यात आले होते. सोमवारी आमदार अ‍ॅड. उत्तम ढिकले आणि डॉ. बी. जी. पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन तर झाले; मात्र समोर प्रेक्षक म्हणून केवळ तीनच नगरसेवक उपस्थित होते. त्यातही ते नगरसेवक म्हणे कॉँग्रेसचेच होते. त्यात माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे आणि लक्ष्मण जायभावे यांचा समावेश होता. प्रशिक्षणाविषयी उदासीन भूमिका दाखविल्याने नगरसेवकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्यांचाही पुरता हिरमोड झाला. उपमहापौरांनी उद्घाटनानंतर काढता पाय घेतला, तर महापौरांनी शिबिराला पाठ दाखवली.

दोन विषयांवर चर्चा
लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील समन्वय तसेच वाढत्या नागरीकरणासमोरील समस्या हे दोन विषय मला देण्यात आले होते. नगरसेवकांचे प्रमाण अत्यंत अल्प होते.
आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले

प्रशिक्षणाविषयी गुप्तता
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या निवासी या प्रशिक्षणाविषयी प्रसारमाध्यमे आणि नगरसेवकांव्यतिरिक्त इतर लोकप्रतिनिधींना दूर सारून कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

सर्व सुविधा देऊनही गैरहजर...
दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिर निसर्गाच्या सान्निध्यात ठेवण्यात आले होते. दोन दिवस वातानुकूलित राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच जेवण, नाश्ता, चहा अशी सोयदेखील करण्यात आली होती. शहरापासून जवळच असूनही नगरसेवकांनी तिथे राहणे तर दूरच साधे उपस्थित राहणेही योग्य समजले नाही.