आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट कार्यालयात मिळणार पुन्हा रेव्हेन्यू स्टॅम्प्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कमिशनच्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पोस्टात मिळणारा एक रुपयांचा रेव्हेन्यू स्टॅम्प गेल्या सहा महिन्यांपासून मिळत नव्हता; मात्र सध्या तीन टक्क्यावरील कमिशन आता दहा टक्क्यांवर गेल्याने आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील पोस्टांमध्ये एक रुपयांचा रेव्हेन्यू स्टॅम्प पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. मात्र स्टॅम्पचे मागील सुमारे 11 लाखांच्या कमिशनसाठी मुख्य पोस्टाला झगडावे लागत आहे.

प्रत्येक आर्थिक व्यवहाराला किंवा परगावी पत्रव्यवहार करण्यासाठी एक रुपयांच्या रेव्हेन्यू स्टॅम्पला विशेष महत्त्व आहे. तसेच राज्य शासनाला त्याद्वारे महसूल प्राप्त होण्यासाठी या स्टॅम्पची विक्री होते; पण नाशिक जिल्ह्यात हा स्टॅम्प मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे पोस्ट कार्यालय. परंतु नाशिक जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून स्टॅम्पच मिळत नव्हते. पूर्वी पोस्टाला स्टॅम्पमागे तीन टक्के कमिशन मिळत होते; मात्र जिल्ह्यात स्टॅम्प पाठविण्यासाठी वाहतूक खर्च तसेच इतर खर्च मिळून तीन टक्के परवडत नव्हते. तसेच महसूल विभागाने मागील 11 लाख रुपये कमिशन दिले नसल्याने पोस्टाला त्या कमिशनसाठीही झगडावे लागत आहे.

दोन रुपयांना मिळतो स्टॅम्प : जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरात स्टॅम्प विक्रीचा मोजक्याच लोकांकडे परवाना आहे. जे परवानाधारक आहेत त्यांना एक रुपये या दरानेच स्टॅम्पची विक्री करता येते, मात्र बॅँकेच्या बाहेर काही लोक थेट दोन रुपयांनी या स्टॅम्पची विक्री करताना आढळतात.

आदेशाची होती प्रतीक्षा
स्टॅम्प विक्रीसाठी दहा टक्के कमिशन मिळण्याची पोस्टाची मागणी होती; मात्र शासनाचे तसे आदेश नव्हते. पोस्टात दरमहा सुमारे 10 लाखाची स्टॅम्प विक्री होते.
-रामभाऊ परघडमल, पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट कार्यालय

पुढील आठवड्यापासून
राज्य शासनाचे कमिशनबाबत स्पष्ट आदेश नसल्याने आम्हाला निर्णय घेता येत नाही; मात्र आता शासनाचे अध्यादेश मिळाले असल्याने पुढील आठवड्यापासून पोस्टाला रेव्हेन्यू स्टॅम्प देण्यात येणार आहे.
-बी. जी. निर्मल, कोषाधिकारी